टोकिओ : जगातील सर्वांत वयोवृद्ध म्हणून गिनिज बुकमध्ये नाव असलेल्या वयोवृद्ध आजींनी आज 117 वा वाढदिवस साजरा केला. केन तनाका यांनी रविवारी जपानच्या एका नर्सिंग होममध्ये केक कापून वाढदिवस साजरा केला.
केन यांचा जन्म 1903 मध्ये झाला होता. 1922 मध्ये त्यांनी हिदेओ तनाका यांच्यासोबत लग्न केले होते. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस् नुसार या दांम्पत्याला चार मुले होती. तसेच त्यांनी एका मुलाला दत्तकही घेतले होते.
तनाका आजींनी नर्सिंग होमच्या कर्मचारी आणि त्यांच्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी मोठा केक कापला. या केकचा तुकडा खाल्ल्यानंतर हसत त्यांनी म्हटले की, ''खूप स्वादिष्ट आहे, मला आणखी हवा.''
गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस् नुसार गेल्या वर्षीच तनाका यांना जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती असल्याचे जाहीर करण्यात आले होते. गेल्या वर्षी 9 मार्चला त्यांचे वय 116 वर्षे 66 दिवस होते. तनाका यांचे दीर्घ वय कमी वयात वृद्ध होणाऱ्या जनतेसाठी एक प्रतिक आहे. गेल्या वर्षी जपानमध्ये जन्म घेणाऱ्या मुलांची संख्या 5.9 टक्क्यांनी घटून नऊ लाखांखाली होती.