दागिन्यांचा सोस कुणाला नसतो? सोनं, हिरे, माणकं, दागिने यांच्याबाबतीत तर जगात भारताचं नाव पहिल्या क्रमांकावर घेतलं जातं. दागिन्यांच्या रूपात भारतीयांकडे जेवढी संपत्ती आहे, तेवढी क्वचितच इतर देशांकडे असेल. दागिने भारतीय संस्कृती आणि परंपरेशी जोडलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही शुभप्रसंगी सोने-चांदीचे दागिने करणं, विकत घेणं ही भारतात अतिशय सर्वसामान्य बाब आहे. त्यामुळेच वेगवेगळ्या डिझाईन्सचे, कलाकुसरीचे, दुर्मीळ दागिने आपल्याकडे असावेत अशी जवळपास प्रत्येक भारतीय स्त्रीची मनीषा असते.
जगातील आत्यंतिक दुर्मीळ आणि मौल्यवान दागिन्यांचा लिलाव आता सुरू होणार आहे. न्यूयॉर्क, सिंगापूर, तैपेई आणि लंडन येथे टप्प्याटप्यानं त्यांचा लिलाव होईल. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारपासून लंडनमध्ये हे दागिने प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. अर्थातच कुठल्याही राजघराण्यातील दागिन्यांचा हा लिलाव नसून ‘पर्सनल कलेक्शन’च्या दागिन्यांची ही विक्री असेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाच व्यक्तीच्या संग्रहातील अत्यंत दुर्मीळ अशा तब्बल सातशे दागिन्यांचा हा लिलाव असेल. यातील एकेका दागिन्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.
उदाहरणादाखलच सांगायचं, तर यात एक हिरा असा आहे, जो कोहिनूर हिऱ्यापेक्षाही जुना तर आहेच, पण तो जगातील पहिला हिरा मानला जात आहे. ‘ब्रायोलेट ऑफ इंडिया’ असं या हिऱ्याचं नाव आहे. ९०.३८ कॅरेटचा हा रंगहीन हिरा सुरुवातीला कित्येक वर्षे लोकांपासून अज्ञात होता. या हिऱ्याचा पहिल्यांदा उल्लेख बाराव्या शतकात झाला होता. इतिहासकारांच्या मते, फ्रान्सची महाराणी एलेनॉर ऑफ एक्वेनेट ही या हिऱ्याची पहिली मालक आहे. या हिऱ्याची उत्पत्ती भारतातील आंध्र प्रदेशात झाली होती, असंही म्हटलं जातं. मध्यंतरीच्या काळात हा हिरा पुन्हा लुप्त झाला होता. त्यानंतर न्यूयॉर्कच्या हेन्री विन्सटन या अब्जाधीशानं १९५० मध्ये भारतातील एका संस्थानिकाकडून हा हिरा खरेदी केला. हाच हिरा १९७१ मध्ये ऑस्ट्रियाचा अब्जाधीश हेलमट हॉर्टनच्या व्यक्तिगत खजिन्याचा सरताज झाला!
व्हाइट गोल्डपासून ते हिरे, माणके, पाचूंचे अनेक दागिने या संग्रहात आहेत. जगभरातून गोळा केलेल्या या दागिन्यांवर देशोदेशीच्या गर्भश्रीमंतांचा डोळा आहे. भारतीय नागरिकही या लिलावात मोठ्या इर्षेने सामील होतील आणि हे दागिने आपल्याकडेच यावेत यासाठी चढी बोली लावतील, अशी आयोजकांची अपेक्षा आहे.
कोट्यवधी रुपयांचे हे हिरे, माणके, दागिने एकाच व्यक्तीचे आहेत; पण ही व्यक्ती आहे तरी कोण? या व्यक्तीचा वैयक्तिक खजिना एवढा मोठा कसा? - हिदी हॉर्टन नावाच्या एका ऑस्ट्रियन महिलेच्या ताब्यातील हे सारे दागिने आहेत. गेल्या वर्षीच तिचं निधन झालं. पती हेलमट हॉर्टनच्या मृत्यूनंतर वारशानं या साऱ्या दागिन्यांचा ताबा हिदी हॉर्टनकडे आला. हेलमट हॉर्डन हा मूळचा जर्मनीचा अब्जाधीश. १९८७ मध्ये त्याचं निधन झालं.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलर आणि त्याच्या नाझी सैनिकांनी ज्यू लोकांवर अनन्वित अत्याचार केले. लाखो ज्यूंचा नरसंहार केला. त्यामुळे लक्षावधी ज्यू लोकांनी त्यावेळी जर्मनी सोडून दुसऱ्या देशांमध्ये आश्रय घेतला. हिटलरच्या काळात आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मरणाच्या छायेत घालवणाऱ्या ज्यू लोकांना मरणाची आणखीच भीती घालून त्यांच्या ताब्यातील संपत्ती, व्यवसाय, घरं.. कवडीमोलानं जर्मनीच्या अनेक लोकांनी खरेदी केली. हेलमट हॉर्टननंही याच मार्गानं मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली असं मानलं जातं.
हिदी हॉर्टन कलेची मोठी भोक्ती होती. जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासोची चित्रं आणि शिल्पंही तिच्या वैयक्तिक संग्रहात होती. आपल्या मृत्यूच्या केवळ तीन वर्षं आधी २०२० मध्ये तिनं हिदी हॉर्टन फाउंडेशनची स्थापना केली होती. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात समाजोपयोगी कामं करण्याचा; विशेषत: कलाकार, कलावंतांना मदत, जागतिक दर्जाचं संग्रहालय उभारणं, वैद्यकीय संशोधन करून सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळवून देणं हा तिचा मानस होता. आता लिलावातून जो पैसा उभा राहील, तोदेखील या फाउंडेशनलाच दिला जाणार आहे.
आइस हॉकीची जबरदस्त फॅनहिदी हॉर्टन कलासक्त, कलासंग्राहक तर होतीच; पण आइस स्केटिंग आणि आइस हॉकीचीही तिला अतिशय आवड होती. आपल्या देशाच्या आइस हॉकी टीमचाही तिला सार्थ अभिमान होता. आपल्या देशाच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी दर्जेदार कामगिरी करावी यासाठी या टीमलाही तिनं कोट्यवधी रुपयांची देणगी दिली होती. त्याच पैशांतून ऑस्ट्रियामध्ये एक नवं आइस हॉकी स्टेडियम उभारलं जातं आहे. हिदीच्या स्मरणार्थ या स्टेडियमला तिचं नाव दिलं जाणार आहे.