जगातील सर्वात वयोवृद्ध महिला म्हणून ओळखल्या जाणा-या व्हायलेट मॉसे ब्राऊन (११७) यांचे जमैकामध्ये निधन झाले. ‘आँट व्ही’ नावाने या बाई त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्या वर्तुळात परिचयाच्या होत्या. त्यांचा जन्म ट्रेलॉनीत १० मार्च, १९०० रोजीचा. आपले प्रदीर्घ आयुष्यही त्यांनी तेथेच घालविले. व्हायलेट यांना या वर्षी १५ एप्रिल रोजी जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून जाहीर केले गेले.व्हायलेट यांच्या आधी इटलीच्या एम्मा मोरॅनोंकडे हा सन्मान होता. त्यांच्या आयुष्याने १८९९ ते २०१७ अशा तीन शतकांना स्पर्श केला होता. असे दुर्मीळ भाग्य लाभलेल्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या. एम्मा यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य म्हणजे, त्यांनी न केलेला विवाह आणि दररोजचा कच्च्या अंड्यांचा आहार.११० वा वाढदिवस साजरा केल्यानंतर, व्हायोलेट स्थानिक दैनिकाशी बोलताना म्हणाल्या होत्या की, लोक मला विचारतात की, दीर्घायुष्य लाभण्यासाठी आम्ही काय खावे व प्यावे? मी त्यांना म्हणते की डुकराचे मांस आणि कोंबडी वगळून सगळे काही खा. मी रम पीत नाही. मी कधी-कधी स्वत:लाच विचारते की, मी ११० वर्षांची आहे? कारण मला तरी तसे वाटत नाही, असेही व्हायलेट म्हणाल्या होत्या. व्हायलेट यांचा जन्म ज्या घरात झाला, त्याच घरात त्यांचा मृत्यूही. एलिझाबेथ राणीने व्हायलेट यांना त्या राष्ट्रकुलातील सगळ््यात वयोवृद्ध व्यक्ती ठरल्याबद्दल सन्मानपत्र पाठविले होते. व्हायलेट यांनी आयुष्याच्या सुरुवातीला शेतमजूर, ऊसतोडणी कामगार व मोलकरीण म्हणून काम केले होते, नंतर त्यांनी मालमत्ता खरेदी केली. त्या त्यांच्या जिल्ह्यातील एकमेव ब्रेड डेपोच्या मालकीण झाल्या होत्या.
जगातील सर्वात वयोवृद्ध व्हायोलेट ब्राऊन निवर्तल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 4:18 AM