लंडन : जगातील वयोवृद्ध एम्मा मोरॅनो यांचे ११७ व्या वर्षी नॉदर्न इटलीतील त्यांच्या घरी १५ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांचा जन्म २९ नोव्हेंबर १८९९ रोजीचा. लेक मॅगीओरेच्या किनाऱ्यावरील व्हर्बानियातील घरी आरामखुर्चीत बसलेल्या असताना त्यांनी जगाचा निरोप घेतला, असे त्यांचे डॉक्टर कार्लो बावा म्हणाले.मोरॅनो या आठ भावंडांपैकी एक. दोन महायुद्धे व इटलीतील ९० सरकारे त्यांनी बघितली. त्यांचा शेवटचा वाढदिवस पार्टी आणि संगीत कार्यक्रमाने साजरा झाला. तागाच्या धाग्यापासून बनवल्या जाणाऱ्या सॅक्सच्या कारखान्यात त्या कामाला होत्या. मारहाण करणाऱ्या नवऱ्यापासून वेगळे राहणाऱ्या महिलेबद्दलच नापसंती व्यक्त होणाऱ्या त्या काळात मोरॅनो यांनी तो (नवऱ्याला सोडण्याचा) धाडसी निर्णय घेतला.आपल्या या दीर्घायुष्याचे रहस्य विचारले असता त्यांनी त्यांच्या सात महिन्यांच्या एकुलत्या एक अपत्याचे निधन झाल्यानंतर लवकरच नवऱ्याला सोडून दिल्याला आणि दररोजच्या जेवणात दोन कच्ची अंडी आणि थोडेसे मांसाचे अतिशय बारीक तुकडे यांना एम्मा २० वर्षांच्या असताना डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या अंगात रक्त खूपच कमी असल्याचे व वरील आहाराने त्यात वाढ होईल, असे सांगितले होते. एम्मा यांनी क्वचितच कधी भाज्या आणि फळे खाल्ली, असे बावा म्हणाले. नवऱ्याला सोडल्यावर त्यांनी लग्न केले नाही व नवऱ्याला घटस्फोटही दिला नाही. मोरॅनो यांना त्या जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले होते. मोरॅनो यांची आई आणि मावशी आणि त्यांची काही भावंडे यांनी ९० वर्षांचे आयुष्य भोगले. एम्मा यांची बहीण अँजेला मोरॅनो या १०२ वर्षे जगल्या होत्या.
जगातील सर्वात वयोवृद्ध महिला एम्मा यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2017 1:43 AM