बर्लिन : जगातील पाळीव प्राण्यांमध्ये सर्वाधिक श्रीमंत असण्याचा मान गुंथर सहा या जर्मन शेफर्ड कुत्र्याला मिळाला आहे. त्याच्या नावावर चार हजार १३२ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. याशिवाय मांजरांसह आणखी काही पाळीव प्राण्यांच्या नावावरही शेकडो कोटी रुपयांची संपत्ती असून त्यांची एक यादी ‘ऑल अबाऊट कॅट्स’ या संस्थेने नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
गुंथर सहा या नावाने प्रसिद्ध असलेल्या जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या नावावर चार हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांची संपत्ती आहे. त्याचे खरे श्रेय त्याचे आजोबा गुंथर तीन यांच्याकडे जाते. गुंतवणुकीच्या उत्पन्नातून गुंथर सहाचे पालनपोषण हाेते. (वृत्तसंस्था)
४,१३२ कोटींची मालमत्ता ‘गुंथर’च्या नावे
काऊंटेस कार्लोटा लिंबेस्टिन यांनी अनेक वर्षापूर्वी ८० दशलक्ष डॉलर इतकी मालमत्ता गुंथर तीन या आपल्या कुत्र्याच्या नावावर केली होती. त्यातत भर पडून ती चार हजार १३२ कोटी रुपये झाली आहे. गुंथर कॉर्पोरेशनने या पैशांची उत्तम ठिकाणी गुंतवणूक केली आहे.
८२६ कोटींची संपत्ती नाला कॅटच्या नावे
नाला कॅट ही इन्स्टाग्रामवर सर्वांत जास्त फॉलोअर असलेली मांजर आहे. त्या फॉलोअरची संख्या ४० लाखांहून अधिक आहे. सयामी- पर्शियन जातीची मांजर असलेल्या नालाच्या नावावर ८२६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. नाला मांजरीचे मालक तिच्या नावाने कॅट फूड कंपनी चालवितात.
८०० कोटींची मालमत्ता ॲलिव्हिया बेन्सनकडे
अमेरिकेतील प्रख्यात गायिका टेलर स्वीफ्ट हिने पाळलेल्या ऑलिव्हिया या मांजरीच्या नावावर एक कंपनी चालवली जाते. या मांजरीने काही म्युझिक व्हिडीओ व जाहिरातींमध्ये कामही केले आहे. त्यासाठी या मांजरीच्या नावे मोठे मानधन घेतले जाते. सध्या ऑलिव्हियाच्या नावावर ८०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
२०० कोटींचा जिफपॉम धनी
पॉमेरियन जातीच्या जिफपॉम या कुत्र्याची ऐट कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. या कुत्र्याचे इन्स्टाग्रामवर ९५ लाख फॉलोअर आहेत. जिफपॉमच्या नावावर सध्या २०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
अमेरिकेतील प्रसिद्ध टॉक शो होस्ट व अब्जोपती ओप्रा विन्फ्री यांनी सँडी, सनी, लॉरेन, लैला, ल्यूक हे पाच कुत्रे पाळले आहेत. या कुत्र्यांच्या नावावर प्रत्येकी २४८ कोटी रुपयांची संपत्ती आहे.