रीनो : एखाद्या मॉडेलचा विषय निघाला की तुमच्या मनात मॉडेलविषयी काय निकष तयार होत असतात? किंवा एखादी मॉडेल कशी असावी याविषयी विचारलं तर तुमचं काय उत्तर असेल? सगळ्यात पहिलं आपल्या समोर येतं ते म्हणजे मॉडेलचा सडसडीत उंच बांधा. उत्तम व्यक्तिमत्व असण्यासाठी आपली उंचीही जास्त असणं महत्त्वाचं आहे, असं म्हटलं जातं. पण या समजूतीला अमेरिकेतील एक मॉडेल अपवाद ठरली आहे. अवघ्या 3 फुट असलेल्या मॉडेलने सोशल मीडियावर अक्षरक्षः धुमाकूळ घातला आहे.
ड्रू प्रेस्टा असं या उंचीने लहान असलेल्या मॉडेलचं नाव आहे. यु.एसच्या नेवाडामधील रिनो या अत्यंत लहान शहरात तिचं बालपण गेलं. फॅशन क्षेत्रात तिला अत्यंत गोडी असल्याने तिने फॅशन मार्केटिंगमध्ये करिअर करायचं ठरवलं आहे. त्यासाठी तिने अमेरिकेत स्थलांतरही केलं. अमेरिकेत स्थलांतर व्हायचं केवळ हे एकच कारण नव्हतं. रिनोसारख्या अत्यंत लहान शहरात तिची फार कुंचबना होत होती. तिच्या उंचीवर आणि तिने निवडलेल्या क्षेत्रावरून अनेकांनी तिला टोमणे दिले होते. त्यामुळे तिच्यात दिवसेंदिवस नकारात्मकता निर्माण होत होती. या सगळ्या गोष्टींवर मात करून लोकांना त्यांच्या हसण्यावर चपराक द्यायला हवी यासाठी तिने शहरात पाऊल ठेवलं. तिचं हे स्थलांतर तिच्या आयुष्यातील एक पर्वणीच ठरली. अमेरिकेत गेल्यावर तिने स्वतःचं फोटोशूट करून घेतलं. हे फोटोशूट आता सोशल मीडियावर फार व्हायरल झालंय. जगातील सगळ्यात शॉर्ट मॉडेल म्हणून लोक तिला ओळखू लागले आहेत. तिचा फॅशन सेन्सही चांगला असल्याने अनेकजण तिला फॉलो करताहेत.
आणखी वाचा - पायांची उंची ४५ इंच, सर्वात लांब पाय असलेली मॉडेल म्हणून डाँग लेई हिची ओळख
21 वर्षीय मॉडेलच्या घरच्यांनीही तिला केव्हाच पाठिंबा दिला नव्हता. रिनोमध्ये तर तिला तिच्या मर्जीप्रमाणे कपडे परिधान करणंही वर्ज्य होतं. मात्र आता ती फॅशन विश्वातील नामवंत डिझायनर झाली आहे. इन्स्टाग्रामवर तर तिचे हजारो फॉलोवर्स आहेत. तसंच तिने फोटोशूट अपलोड केल्यावर तिच्या फॉलोवर्सची संख्या वाढली असून सौंदर्याची व्याख्याच जणू तिने बदलली आहे. कित्येकांना आपल्या रंगामुळे, उंचीमुळे, व्यक्तीमत्त्वामुळे न्यूनगंड निर्माण होतो. मात्र या न्यूनगंडातून बाहेर पडून स्वतःवर विश्वास ठेवल्यास आपणही एखाद्या गोष्टीची नवी व्याख्या तयार करू शकतो हेच ड्रू या मॉडेलने अख्या जगाला पटवून दिलं आहे.
सौजन्य - www.ngyab.com आणि khabar.ndtv.com