लंडन : जगातील सर्वात उंच व्यक्ती समजले जाणारे युक्रेनमधील शेतकरी लियोनिद स्तादनिक यांचे वयाच्या ४४ व्या वर्षी निधन झाले. त्याची उंची आठ फूट चार इंच होती. युक्रेनच्या पोदोलियांत्सी गावातील रहिवासी लियोनिद स्तादनिक यांचे मेंदूतील रक्तस्रावाने रविवारी निधन झाले. स्तादनिक यांच्या पायाचा तळवा १८ इंच लांब होता, तर त्यांच्या पंजाचा व्यास एक फुटापेक्षा जास्त होता. त्यामुळे ते बिलियर्ड टेबलवर झोपत असत. अत्यंत लाजाळू स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी कधीही गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्साठी दावेदारी केली नाही, असे मिरर डॉट को युकेच्या वृत्तात म्हटले आहे. एका मुलाखतीत स्तादनिक यांनी आपली उंची आपल्यासाठी शाप असल्याचे म्हटले होते. एवढी उंची हा ईश्वराचा शाप आहे. ती खुश होण्यासारखी गोष्ट नाही, असे ते म्हणत. उंचीमुळे मिळणारी कीर्ती मला नको आहे. मला अशा कीर्तीची आवश्यकता नाही. त्यामुळेच गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदण्याची मला आवश्यकता वाटत नाही, असेही ते म्हणाले होते. स्तादनिक १२ वर्षांचे असताना त्यांच्या डोक्यात गाठ झाली होती. त्यामुळे त्यांच्या शरीरात उंची वाढवणाऱ्या हार्मोनचा स्राव प्रचंड वाढला. दर तीन वर्षांनी जाडीच्या तुलनेत त्यांची उंची एक फुटाने वाढत होती. (वृत्तसंस्था)
जगातील सर्वात उंच व्यक्तीचे निधन
By admin | Published: August 27, 2014 1:15 AM