नवी दिल्ली : जगात कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १ लाख, ६९९७ वर गेली असून या आजाराने सर्वाधिक म्हणजे १९ हजार बळी अमेरिकेत घेतले आहेत. अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृत यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
जगातील २११ देशांमध्ये आतापर्यंत १७ लाख, ३५ हजार रुग्ण आढळून आले, त्यापैकी १२ लाख, ३० हजार जणांवर सध्या उपचार सुरू असून त्यापैकी ५० हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, सुमारे ४ लाख रुग्ण या आजारातून बचावलेही आहेत. अमेरिकेमध्ये रुग्णांची संख्या ५ लाख, ३ हजारांवर गेली आहे. अमेरिकेखालोखाल इटलीमध्ये १८ हजार, ९०० जण कोरोनामुळे मरण पावले आहेत आणि स्पेनमध्ये मृतांचा आकडा १६ हजार, ५०० वर गेला आहे. फ्रान्समध्ये कोरोनाच्या विषाणूंनी १३ हजार, २०० जणांचा तर ब्रिटनमध्ये ९ हजारांहून अधिक रुग्णांची बळी घेतला आहे.चीनमध्ये कोरोना संसर्गावर बऱ्यापैकी अटकाव घातला गेला असून तिथे गेल्या २४ तासांत केवळ दोन बळी गेले आहेत. मात्र तेथील मृतांची संख्या ३ हजार ३५०च्या जवळ पोहोचली आहे. इराणमध्येही कोरोनाबाधितांच्या मृत्यूंचे प्रमाण कमी होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीतून दिसते. अर्थात तिथेही मृत्यूंचा आकडा जवळपास ५ हजारांजवळ गेली आहे. म्हणजेच जगात आतापर्यंत झालेल्या १ लाख, ५ हजार मृत्युंपैकी सुमारे ८० हजार मृत्यू याच सात देशांमध्ये झाले आहेत. बेल्जियम आणि नेदरलँड या दोन देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण व मृत यांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.देशात १,०३५ नवे रुग्णभारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १,०३५ नवीन रुग्ण आढळले असून त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ८ हजार ४१७ च्या घरात गेली आहे. त्यापैकी ६ हजार, ६३४ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९६९ जण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. मात्र मृतांची आकडा २८८ वर गेला आहे. मुंबई, दिल्ली ही महानगरे आणि तामिळनाडू राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे.