कोझिकोडे : टॉम हुपर यांच्या ‘द डॅनिश गर्ल’ या चित्रपटातील लिली एल्बी या पात्राला आपण स्त्री असल्याचे वाटत राहते. एवढेच नव्हे, तर त्याच्या पत्नीचीही तशीच समजूत होते. एडी रेडमायनी यांनी वठवलेले एल्बीचे पात्रही गाजले होते; मात्र रील लाईफमधील असे कथानक रियल लाईफमध्ये अनुभवण्याचा विचित्र प्रकार कोझिकोडे येथे चर्चेचा विषय बनला आहे.कोझिकोडे येथील ५२ वर्षीय इसम दोन मुलांचा बाप आहे. त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, सध्या बेरोजगार बनला आहे. त्याला पोटात गर्भ असल्याची जाणीव होत असल्याने त्याचे कुटुंबीय हैराण झाले आहेत. शेवटी त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचा मार्ग अवलंबला. मला पोटात बाळाच्या हालचाली जाणवतात. नेहमीपेक्षा वेगळी अशी संवेदनशीलता जाणवते असे त्याचे म्हणणे आहे. पुरुषाला मूल होऊ शकत नाही, हे मानायलाही तो तयार नाही.सध्या तो पूर्णपणे विश्रांती (बेडरेस्ट) घेत असून त्याने काम पूर्णपणे बंद केले आहे. त्याने आहारही कमी केल्यामुळे चिंतेत पडलेल्या भावाने त्याला डॉक्टरांकडे नेले. त्याचे समुपदेशन केले जात असताना त्याने समलिंगी संबंधातून गर्भ राहिल्याचा दावा केला आहे. त्याच्या विविध चाचण्या पार पाडल्यानंतर हा केवळ भ्रम असल्याची, मात्र अशा प्रकारची प्रक्रिया दुर्मिळ असल्याचा दावा डॉक्टरांच्या चमूने केला आहे. त्याच्या भावाने त्याला सहा महिन्यांपूर्वी या विचित्र भ्रमाचा त्रास सुरू झाल्याची माहिती दिली. डॉ. पी.एन. सुरेश कुमार यांनी कुठल्यातरी अस्वाभाविक समजुतीतून हा भ्रम निर्माण होत असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था) सर्व काही सामान्य... - पौंगडावस्थेतच त्याने सातत्यपूर्ण समलिंगी संबंध ठेवले होते, त्यातून त्याची ही भावना झाली असावी. त्याच्या समलिंगी संबंधांचा त्याच्या वैवाहिक जीवनावर कोणताही परिणाम झालेला नाही. - काही लोकांमध्ये पत्नी गर्भवती असताना झोपेचा प्रश्न किंवा वजन वाढण्यासारखे प्रकार आढळून येतात; मात्र त्याच्यात लैंगिक आजार किंवा नैराश्य, अधीरता यासारखा मानसिक आजारही आढळून आलेला नाही. त्याच्या सर्व चाचण्या तो सर्वसामान्य असल्यावरच शिक्कामोर्तब करणाऱ्या आहेत, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. त्याचे समुपदेशन केले जात असून मेंदूतील रसायन बदलाबाबत औषधोपचार केले जात आहेत. - वैद्यकीय उपचारानंतर तो आता पूर्ववत होण्याच्या मार्गावर आहे. त्याने समलिंगी संबंध पूर्णपणे बंद केले आहेत. त्याची नियमित तपासणी केली जात असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली.
पोटात गर्भ वाढत असल्याच्या भ्रमाने ‘तो’ चिंतित
By admin | Published: February 09, 2016 4:02 AM