नवी दिल्ली - मुलींच्या शिक्षणासाठी आपलं सबंध आयुष्य अर्पण करणाऱ्या नोबल पारितोषिक विजेत्या मलाला युसूफझाई हिने काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यानंतर भीती व्यक्त केली. काश्मीर कलम ३७० अंतर्गत देण्यात आलेला विशेष दर्जा भारत सरकारने हटविला आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये तणापूर्ण शांतता आहे. यावर मलाला हिने काश्मीरमधील लहान मुलांची आणि महिलांची काळजी वाटत म्हटले आहे. या संदर्भात मलालाने ट्विटवर पोस्ट शेअर केली आहे.
केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला दिलेला विशेष दर्जा काढून घेतला असून काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण असून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच काश्मीरमध्ये इंटरनेट आणि दुरसंचार सेवा बंद करण्यात आली आहे.
मलालाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, माझे आई-वडिल लहान होते तेव्हापासून काश्मीरमधील लोक संघर्षमय जीवन जगत आहेत. दक्षिण आशियाला मी माझं घर समजते, त्यामुळे काश्मीरविषयी मला विशेष काळजी वाटते. एकमेकांना अडचणीत टाकण्याची आपल्याला काहीही आवश्यकता नाही. परंतु, सध्याच्या परिस्थितीत काश्मीरमधील लहान मुलं आणि महिलांची काळजी वाटत आहे. काश्मीरमधील स्थिती अत्यंत तणापूर्ण असून संघर्ष झाल्यास अनेकांचे नुकसान होऊ शकते, असंही मलालाने नमूद केले.