नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या जगासमोर गंभीर संकट उभे राहिले आहेत. कोरोनाच्या फैलावाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन तसेच इतर उपाय करण्यात येत असल्याने उद्योग व्यवसायांना फटका बसला असून, अर्थचक्र मंदावले आहे. परिणामी कोट्यवधी लोकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. दरम्यान, कोरोनाच्या या प्रकोपामुळे यावर्षी जगभरात ८.३ कोटी ते १३ कोटी लोकांची उपासमार होण्याची भीती स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड (SOFI) २०२० च्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
मार्च २०२० च्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये सुमारे ६९ कोटी लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. ही आकडेवारी २०१८ च्या तुलनेत एक कोटींनी अधिक होती. SOFI या संस्थेचा अहवाल सोमवारी न्यूयॉर्कमध्ये प्रसिद्ध करण्यात आला.
निरंतर विकास लक्ष्य २०३० चे उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध राष्ट्रांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न व कृषी संघटना (एफएओ), कृषी विकास आंतरराष्ट्रीय निधी (आयएफएडी), संयुक्त राष्ट्र बालकल्याण निधी (युनिसेफ), यूएन वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्ल्यूएफपी) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) या संघटनांचा हा संयुक्त उपक्रम आहे.
दरम्यान, पाच वर्षांनंतर जग उपासमारीमुक्त, अन्नाची असुरक्षितता आणि कुपोषणमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले असले तरी आपल्यासाठी २०३० पर्यंत हे लक्ष्य गाठणे कठीण आहे, असा इशारा या पाच संघटनांनी दिला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही