नवी दिल्ली – अफगाणिस्तानवरतालिबानने कब्जा मिळवल्यानंतर तेथील नागरिकांनी देश सोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काबुल एअरपोर्टवर लोकांची प्रचंड गर्दी आणि विमानात चढण्यासाठी होत असलेली चढाओढ याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो जगासमोर आले. विमानावर बसून लोक प्रवास करण्याच्या प्रयत्नात असताना काहीजण खाली कोसळले हे भीषण चित्र अफगाणिस्तानातून समोर आलं होतं. आजही अफगाणिस्तानातून मोठ्या संख्येने लोकं देशाबाहेर जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
याच दरम्यान आणखी काही फोटो समोर आले आहेत. ज्यात अफगाणिस्तानमधील नागरिकांवर तालिबानींची किती दहशत आहे त्याच्या विदारक स्थितीचा अंदाज लावता येईल. अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर हजारो अफगाणी लोकांनी गर्दी केली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अफगाणी लोकं पाकिस्तानात घुसण्याच्या प्रयत्नात आहेत. स्पिन बोलदाक बॉर्डरवरील हे चित्र आहे. याठिकाणी लोकं पाकिस्तानच्या सीमेवरील गेट उघडण्याच्या प्रतिक्षेत आहेत जेणेकरून ते सगळे पाकिस्तानात जाऊ शकतील.
एका पत्रकाराने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. तो म्हणतो की, हे काबुल एअरपोर्ट नसून स्पिन बोलदाक बॉर्डर आहे. ज्याठिकाणी हजारो लोकं अफगाणिस्तानातून पाकिस्तानात जाण्यासाठी पलायन करत आहेत. याठिकाणी काबुल एअरपोर्टपेक्षाही भयानक अवस्था आहे. कारण याठिकाणी कुणीही परदेशी सैनिक तैनात नाही. त्यामुळे याकडे कोणाचंही लक्ष जात नाही असं त्याने सांगितले आहे. अफगाणिस्तानात तालिबानी सत्ता आल्यापासून देशातील नागरिक अन्य देशात पलायन करण्याच्या प्रयत्न करत आहेत. काबुलमधून सातत्याने विमान उड्डाण होत आहे. ज्यात अफगाणी नागरिकांसह परदेशी लोकांचाही समावेश आहे.
अमेरिकेच्या माहितीनुसार, १५ ऑगस्टपासून आतापर्यंत जवळपास ८० हजाराहून अधिक लोकांनी विमानाच्या माध्यमातून देश सोडला आहे. अमेरिकेशिवाय नाटो देशानेही त्यांच्या नागरिकांना आणि अफगाणी नागरिकांना तिथून बाहेर काढलं आहे. भारताकडून अद्याप रेस्क्यू मिशन चालवलं जात आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान बॉर्डर नजीक असल्याने पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या अफगाणी नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. एका रिपोर्टनुसार जवळपास १४ लाखापेक्षा अधिक अफगाणी लोक यावेळी पाकिस्तानमध्ये शरणार्थी म्हणून गेले आहेत.
पाकिस्तानवर कब्जा करुन अण्वस्त्र ताब्यात घेईल तालिबान?
अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेल्या तालिबानकडून पाकिस्तानला अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात आणि यातून अण्वस्त्र तालिबान्यांच्या ताब्यात जाण्याची भीती आहे याबाबतची योग्य काळजी पाकिस्ताननं घ्यावी, असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी केलं आहे. तालिबान्यांनी वाऱ्याच्या वेगानं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला हे संपूर्ण जग आज पाहातंय. याचे दूरगामी परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात. अफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्याची माघार आणि तेथील अमेरिकन नागरिकांची सुटका यात खूप तफावत झाली. खूप वेळ वाया गेला. तालिबान शासनमध्ये आज अशी स्थिती आहे की महिलांना, मुलींचा छळ, नागरिकांचे हक्क हिरावून घेणं आणि असंख्य अफगाणी नागरिकांचं स्थलांतर होत आहे. यात चीन या सर्व परिस्थितीचा फायदा घेत असून तालिबानसोबत आपले संबंध मजबूत करण्यासाठीचे प्रयत्न करत आहे. याचे खूप वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात असंही अमेरिकन सीनेटच्या सदस्यांनी म्हटलं आहे.