पणजी : सांस्कृतिक दहशतवादाविरुद्ध देशातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांनी घेतलेली भूमिका योग्य आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.सबनीस यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गोव्यात ५० मतदार आहेत. त्यांना संपर्क करण्याच्यादृष्टीने सबनीस गोवा भेटीवर आले आहेत. येथील गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात सबनीस यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला.साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांची हत्या, दादरी हत्याकांड अशा ँँप्रकारच्या देशातील घटनांच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना सबनीस म्हणाले की, सध्याची स्थिती चिंताजनक आहे. विचारवंतांच्या हत्या होत आहेत. हिंदू धर्मवादाचा उन्माद सर्वांवर थोपविण्याचा प्रयत्न होत आहे. अशावेळी देशातील विचारवंत व साहित्यिकांनी दंड थोपटले व साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करत सरकारचा निषेध केला तर ती त्यांची चूक आहे, असे मुळीच म्हणता येणार नाही. मात्र, पुरस्कार परत केल्यानंतर विषय संपला असे होत नाही. सध्याच्या स्थितीवर उपाय काढण्यासाठी साहित्यिकांनी संवाद साधायला हवा, रस्त्यावर उतरायला हवे.साहित्य संमेलनांविषयी सबनीस म्हणाले की, साहित्य संमेलनांवर अवाढव्य खर्च होऊ नये; पण साहित्य संमेलनांचे उत्सव साजरे व्हायला हवेत. त्यातून सांस्कृतिक श्रीमंती जर वाढत असेल तर दिवाळीप्रमाणेच साहित्य सोहळेही मला प्रिय आहेत. तरुण वर्गही मोठ्या प्रमाणात संमेलनांमध्ये भाग घेतो. मात्र, तरुणांना कार्यक्रमांमध्ये सामावून घ्यायला हवे. त्यांना संमेलनाची कार्यक्रम पत्रिकाही जायला हवी. खेड्यापाड्यातील उमलत्या प्रतिभांना साहित्य संमेलनात स्थान मिळायला हवे. (खास प्रतिनिधी)मी मोदींचाटीकाकारच, मात्र...पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवादासाठी योग्य नेते आहेत, असे मला वाटते. गोध्रा हत्याकांडामुळे कलंकित झालेले मोदी पंतप्रधान बनल्यानंतर जगात फिरताना बुद्ध व गांधींचे तत्त्वज्ञान मान्य करतात, हे आम्ही लक्षात घ्यायला हवे. मला वाटते की, मोदी यांचे हिंदुत्त्व आरएसएस व मोहन भागवत यांच्या हिंदुत्वाची चौकट ओलांडून पुढे गेले आहे. म्हणून त्यांच्याशी संवाद व्हायला हवा. मोदी कदाचित राजकीय तडजोड म्हणून बुद्ध व गांधींचा उल्लेख करत असतीलही; पण जगासमोर ते या महामानवांविषयी बोलतात हेच महत्त्वाचे आहे. मी मोदींचा टीकाकारच आहे, असे सबनीस म्हणाले.
सांस्कृतिक दहशतवादाविरुद्ध लेखकांची भूमिका योग्य
By admin | Published: October 18, 2015 2:15 AM