ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 16 - जगातील सर्वात आघाडीची कंपनी म्हणून गुगल परिचित आहे. गुगलमध्ये नोकरीसाठी अनेक संधी उपलब्ध असतात. तसेच गुगल नुकसानभरपाई पॅकेज, भत्त्यासह अनेक सुविधा कर्मचा-यांना देत असल्यामुळेच गुगलसोबत काम करण्याची अनेकांची इच्छा असते. गुगलकडे हजारोंहून अधिक नोकरीसाठी दररोज अर्ज येत असतात. मात्र या हजारो लोकांमध्ये एका 7 वर्षांच्या मुलीनंही गुगलला पत्र लिहून नोकरी करू इच्छिते, असं कळवलं आहे. विशेष म्हणजे क्लो ब्रिजवाटर या मुलीनं इतर कोणात्याही विभागाऐवजी थेट गुगलच्या सीईओंनाच पत्र लिहिलं आहे. पत्रात ती म्हणते, प्रिय गुगल मालक, माझं नाव क्लो आहे आणि मी जेव्हा मोठी होईन त्यावेळी मला गुगलमध्ये काम करण्याची इच्छा आहे. मला संगणक फार आवडतात. माझ्याकडे टॅबलेट असून, मी त्याच्यावर गेम खेळते. माझे शिक्षक माझ्या आई-वडिलांना मी अभ्यासात हुशार असल्याचं सांगतात. मी बिन बॅगवर बसते आणि गुगलच्या खाली जॉब शोधत बसते. तसेच मला चॉकलेटच्या कारखान्यात काम करायलाही आवडेल, ऑलिम्पिकमध्ये जलतरणपटू होण्याची माझी इच्छा आहे. गुगलला बरेच अर्ज प्राप्त होतात. मात्र ते थेट सीईओपर्यंत ते पोहोचत नाहीत. त्यामुळेच मी थेट सीईओंना पत्र लिहिलं आहे.विशेष म्हणजे या पत्रावर गुगलचे सीईओ सुंचर पिचाईंनीही वेळात वेळ काढून सुंदर उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, प्रिय क्लो, तुला कॉम्प्युटर आणि रोबोट्स आवडतात हे ऐकून मला आनंद झाला. मला आशा आहे की, तू कायम नवनवे तंत्रज्ञान आत्मसाद करत राहशील. जर तू तुझी स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कठीण परिश्रम करत राहिलीस,तर बुद्धीच्या जोरावर तू काहीही साध्य करू शकतेस. जेव्हा तुझं शालेय शिक्षण पूर्ण होईल त्यावेळी मी तुझ्या या पत्राचा नक्कीच विचार करेन. जर तुला खरोखरच गुगलमध्ये काम करायचंय. तर तू आधी तुझ्या प्रोग्रॅमिंग कौशल्याला चालना देऊन पदवी संपादन केली पाहिजेस. त्यावेळी कदाचित तू पुन्हा सीईओंना पत्र पाठवू शकतेस, असे सुंदर पिचाई म्हणाले आहे. सुंचर पिचाई यांच्या या सुरेख उत्तरानं अनेक जण आश्चर्यचकित झाले आहे.
7 वर्षीय मुलीनं नोकरीसाठी लिहिलं गुगलला पत्र, पिचाईंनी दिलं उत्तर
By admin | Published: February 16, 2017 12:46 PM