वॉशिंग्टन : भारताचे राष्ट्रपिता ‘महात्मा गांधी’ यांचा चुकीचा कोट (विधान) पोस्ट केल्याने अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अडचणीत सापडले आहेत.‘आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. मग तुमच्यावर हसतील. त्यानंतर तुमच्याशी लढतील, अखेरीस तुमचा विजय होईल - महात्मा गांधी’ अशी पोस्ट ट्रम्प यांनी सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर टाकली आहे. हे विधान थोर भारतीय नेते महात्मा गांधी यांचे असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले आहे. मात्र, हे विधान बापूंचे असल्याबाबतचा कोणताही पुरावा नसल्याचे सांगून अमेरिकी माध्यमांनी त्यांचा दावा फेटाळून लावला आहे.महात्मा गांधी यांचा चुकीचा कोट टाकल्यावरून रण माजलेले असताना ट्रम्प यांच्या प्रचार कार्यालयातून याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. गांधी यांनी असे कधीही म्हटले नव्हते, असे स्कॉट टी स्मिथ यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. इटालियन फॅसिस्ट नेते मुसोलिनी यांचे कोट टाकल्यावरून टीका झाल्यामुळे महात्मा गांधी यांचे कोट टाकून टीका थांबविण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न होता. मात्र, झाले उलटेच. दरम्यान, अनेक लोकप्रिय संकेतस्थळे हा कोट महात्मा गांधी यांचा असल्याचे सांगतात. त्यामुळे गल्लत होते, असे विकीकोट्सने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
ट्रम्प यांच्याकडून बापूंचा चुकीचा संदर्भ
By admin | Published: March 02, 2016 2:32 AM