ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. २२ - एक्स रे मशिनच्या रेडिओअॅक्टिव्ह लहरींच्या मा-याने मुस्लीमांचे सामूहिक शिरकाण करण्याचा कट रचल्याचा ग्लेन्डन स्कॉट क्रॉफर्ड याच्यावरील आरोप सिद्ध झाला असून त्याला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. ग्लेन्डन निर्दोष असून त्याला FBI ने गोवल्याचा दावा न्यायालयाने फेटाळला आहे. ग्लेन्डन हा जनरल इलेक्ट्रिक कंपनीमध्ये इंडस्ट्रियल मेकॅनिक होता. त्याला किती वर्षांची शिक्षा होते यावर १५ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
या निर्णयाविरोधात ग्लेन्डनचे वकिल अपील करणार आहेत. ५१ वर्षीय ग्लेन्डनला दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली असून तेव्हापासून तो तुरुंगात आहे. ग्लेन्डन काही ज्यूंना भेटला आणि त्याने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शत्रूंना मारता येईल अशी कल्पना सांगितली. तेव्हापासून पोलीस ग्लेन्डनवर पाळत ठेवून होते. ग्लेन्डन कू क्लक्स क्लॅन या दहशतवादी संघटनेच्याही संपर्कात आल्याचे पोलीसांना आढळले होते.
ग्लेन्डनने एका संवादात इस्लाम म्हणजे डीएनएची संधीसाधू लागण असल्याचं मत मांडताना किरणोत्साराद्वारे विषप्रयोग योग्य ठरेल असे मत व्यक्त केले होते. मशिदीमध्ये सामूहिक नमाजाच्यावेळी मोबाईल एक्स रे मशिनच्या माध्यमातून जीवघेण्या रेडिओअॅक्टिव्ह लहरींचा मारा करायचा व मोठ्या संख्येने जमलेल्या मुस्लीमांचे शिरकाण करायचे अशी क्रूर आखणी तो करत होता.
सरकारची बाजू मांडणा-या वकिलांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ग्लेन्डनने अथक प्रयत्न केल्याचे पोलीसांना आढळल्याचे नमूद केले. अत्यंत थंड डोक्याने व विचारपूर्वक असा कट आखण्यात येत होता. ग्लेन्डनचे वकिल सांगतात त्याप्रमाणे तो बालिश नव्हता तर अत्यंत क्रूरपणे हा कट अमलात आणण्याचा प्रयत्न करत होता, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला, जो न्यायालयाने ग्राह्य मानला व त्याला दोषी ठरवले.
या गुन्ह्यासाठी अमेरिकी कायद्याप्रमाणे त्याला २५ वर्षांचा कारावास होऊ शकतो. दरम्यान, त्याच्या वकिलांनी या निर्णयाविरोधात दाद मागण्याची तयारी केली आहे.