चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना राष्ट्रपती भवनातच नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. उज्बेकिस्तानच्या समरकंदमध्ये एससीओ समिटला गेलेले असताना सैन्याने त्यांना अध्यक्षपदावरून हटविल्याचे सांगितले जात आहे. जगभरात या चर्चेमुळे खळबळ उडालेली असताना ना चीनने, ना कम्युनिस्ट पार्टीने, ना चिनी सरकारचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने यावर चकार शब्द काढलेला नाहीय. यामुळे जिनपिंग यांच्या हाऊस अरेस्टवरून सोशल मीडियावर अफवांचा बाजार गरम झाला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर #XiJinping हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला आहे. हजारोंच्या संख्येने ट्विट केले जात आहेत. भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील ट्विट केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटलेय की, शी जिनपिंग यांना खरोखरच नजरकैदेत ठेवले आहे का? या अफवेची एकदा चौकशी केली पाहिजे.
"चीनबाबत एक नवीन अफवा पसरली आहे, ज्याची चौकशी केली जाईल. शी जिनपिंग नजरकैदेत आहेत का? जिनपिंग समरकंदमध्ये असताना चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी त्यांना लष्करप्रमुख पदावरून हटवले आहे. त्यानंतर ते नजरकैदेत असल्याची अफवा आहे.'' असे स्वामी यांनी म्हटले आहे. या ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.
भारतातच नाही तर चीनच्या सोशल मीडियावर देखील याचीच चर्चा आहे. काही युजर्सनी जिनपिंग यांना हाऊस अरेस्ट केल्याचा दावा केला आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ने त्यांना राष्ट्रपती पदावरून हटविले आहे आणि सत्ता ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. आता चीनचे राष्ट्रपती ली कियाओमिंग यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सुत्रे हातात घेतली आहेत. सध्या तरी अशा बातम्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर या केवळ अफवा आहेत, असे म्हटले जात आहे. चीनबाबत बातम्या देणाऱ्या ग्लोबल टाइम्स, सीएनएन किंवा बीबीसीसारख्या वाहिन्यांनीही याला दुजोरा दिलेला नाही. परंतू त्यांनी नाकरलेले देखील नाहीय.
चीनमध्ये याच आठवड्यात दोन माजी मंत्र्यांना मृत्यूदंड आणि चार अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ते एका राजकीय गटाचा भाग होते. कम्युनिस्ट पार्टीचा भ्रष्टाचारावर प्रहार सुरु आहे. हे अधिकारी आणि मंत्री जिनपिंग यांचे विरोधक होते. यामुळे जिनपिंग विरोधकांनी ही अफवा पसरविली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.