बिजिंग - भारतासोबत सुरू असलेल्या तणावातच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सैन्याला कोणत्याही क्षणी युद्धासाठी तयार राहण्याचा आदेश दिला आहे. एवढेच नाही, तर प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थितीत युद्धाभ्यास करण्याचा आदेशही जिनपिंग यांनी सैन्याला दिला आहे. गेल्या वर्षी जून महिन्या गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैन्यांत हिंसक झटापट झाली होती. यात 20 भारतीय सैनिकांना हौतात्म्य आले होते, तर 40हून अधिक चिनी सैनिक मारले गेले होते. तेव्हापासून भारत-चीन संबंध ताणले गेले आहेत.
शिन्हुआ वृत्त संस्थेनुसार, 2021मध्ये केंद्रीय सैन्य आयोगाचे (सीएमसी) चेअरमन म्हणून देण्यात आलेल्या आपल्या पहिल्या आदेशात, पीपल्स लिब्रेशन आर्मीने (पीएलए) कोणत्याही क्षणी युद्धासाठी तयार रहायला हवे, असे शी यांनी म्हटले आहे. याच बरोबर, प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थितीचे प्रशिक्षण घेऊन आपली स्थिती बळकट करावी. जेणेकरून कुठल्याही स्थितीत युद्ध जिंकता यावे, असेही शी म्हणाले.
साऊथ चायना मार्निग पोस्टनुसार, शी म्हणाले, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या (सीपीसी) पीएलएला 1 जुलैपर्यंत यासंदर्भात उत्कृष्टता मिळवायची आहे. 1 जुलैला सीपीसीचा 100वा वर्धापन दिवस आहे. शी यांनी सरावादरम्यान तांत्रज्ञानाचा अधिक वापर करा असेही म्हटले आहे. यात कंप्यूटर, आणि ड्रिलमध्ये ऑनलाईन स्पर्धांचा समावेश आहे. 2012च्या अखेरीस सीएमसीचे अध्यक्ष झाल्यापासूनच शी पीएलएला युद्धासाठी तयार राहण्याचा संदेश देत आहेत. 2015 मध्ये त्यांनी चिनी सैन्याच्या आधुनिकिकरणाला सुरुवात केली होती.
यातच भारतीय जवान डोळ्यात तेल घालून आपल्या सीमांचे रक्षण करत आहेत. एवढेच नाही, तर ते कोणत्याही परिस्थितीत शत्रूला जशासतसे उत्तर द्यायलाही तयार आहेत. सीमावादाच्या पार्श्वभूमीवर चीनने पूर्व लडाखमध्ये रडार, जमिनीवरून हवेत आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि इतर शस्त्रास्त्रेही मोठ्या संख्येने जमवली आहेत. तर इकडे, भारतही पूर्णपणे तयार आहे. भारताने मोठ्या संख्येने टी-90 आणि टी -72 टँक, तोफा, तसेच इतर प्रकारची तयारीही केली आहे. मात्र, असे असतानाही दोन्ही देशात शांततेसाठी सैन्य आणि राजकीय स्थरावरील चर्चाही सुरू आहे.