चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शनिवारी देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी चीनमध्ये कोरोनाच्या लाटेने नवीन टप्प्यात प्रवेश केल्याचे मान्य केले आहे. तसेच याला तोंड देणे देखील खूप कठीण असल्याचे म्हटले आहे. असाधारण प्रयत्नांनी, आम्ही अभूतपूर्व अडचणी आणि आव्हानांवर मात केली आहे. हा प्रवास कोणासाठीही सोपा नव्हता, असे ते म्हणाले.
चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजविला आहे. हॉस्पिटलमध्ये जागा उरलेली नाहीय, स्मशानभूमीसमोर रांगा लागल्या आहेत. औषधांची प्रचंड टंचाई जाणवू लागली आहे. गेल्या काही दिवसांत जिनपिंग यांनी दुसऱ्यांदा कोरोना परिस्थितीवरून संबोधित केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वारंवार आवाहन केल्यानंतर चीनने शुक्रवारी आपल्या अधिकाऱ्यांना जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांशी बोलण्याची परवानगी दिली.
अधिकारी, जनता, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते सर्वजण कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी कटिबद्ध आहेत. हा साथीचा रोग रोखण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी आणखी काम करण्याची गरज आहे. यासाठी सर्वजण मेहनत घेत आहेत. आपल्यासमोर आशेचा किरण दिसत आहे. चिकाटी आणि एकजूट म्हणजे विजय पक्का, या संकटावर मात करण्यासाठी आपण आणखी एक प्रयत्न करूया, असे आवाहन जिनपिंग यांनी केले आहे.
कोरोना आल्यापासून आम्ही लोकांच्या जीविताच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. विज्ञान-आधारित आणि लक्ष्यित दृष्टिकोनाचा अवलंब करून, आम्ही शक्य तितक्या प्रमाणात लोकांच्या जीवनाचे आणि आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कठोर पाऊले उचलली आहेत, असे ते म्हणाले.
देशाने मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या आहेत. तीन वर्षांपासून सुरु असलेले झिरो कोविड धोरण देखील संपविले आहे. 2022 मध्ये आपण भूकंप, पूर, दुष्काळ आणि जंगलातील आग यासह अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे. या अडचणींचा सामना करण्यासाठी आम्ही एकत्र राहिलो, असे जिनपिंग म्हणाले.