Yana Mir speech on Pakistan at UK parliament: काश्मिरी कार्यकर्त्या आणि पत्रकार याना मीर यांनी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला आहे. याना मीर म्हणाल्या की, पाकिस्तान चुकीचा प्रचार करत आहे. त्यांनी याचा तीव्र निषेध केला आणि सांगितले की भारताचा भाग असलेल्या काश्मीरमध्ये लोक पूर्णपणे सुरक्षित आणि मुक्त आहेत. मलाला युसूफझाईचा संदर्भ देत त्या असेही म्हणाल्या की, त्या स्वत: मलाला नाही, जिला दहशतवादाच्या भीतीने आपलाच देश (पाकिस्तान) सोडावा लागला. त्या भारतात मुक्तपणे विचार मांडू शकतात आणि सुरक्षित राहू शकतात. त्यांच्या या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. याना मीर लंडनमध्ये ब्रिटीश संसदेने आयोजित केलेल्या 'रिझोल्यूशन डे' मध्ये बोलत होत्या. त्यांनी आंतरराष्ट्रीय मीडिया समुदायाला जम्मू-काश्मीरमधील लोकांमध्ये फूट पाडणे थांबवावे, असेही आवाहन केले.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/919295876647648/}}}}
याना मीर म्हणाली, 'मी मलाला युसूफझाई नाही, कारण मी माझ्या देशात, भारतात स्वतंत्र आणि सुरक्षित आहे. माझ्या जन्मभूमीत, काश्मीरात भारताचा जो भाग आहे तो सुरक्षित आहे. मला कधीही पळून जाऊन इतर देशात आश्रय घेण्याची गरज भासणार नाही. मी मलाला युसुफझाई कधीच होणार नाही, पण मलालाला पिडित म्हणवून माझ्या देशाची, माझ्या पुरोगामी मातृभूमीची बदनामी केल्याबद्दल मला आक्षेप आहे. सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय मीडियाच्या अशा सर्व टूलकिट सदस्यांना माझा आक्षेप आहे, ज्यांनी कधीही भारतातील काश्मीरला भेट देण्याची तसदी घेतली नाही, परंतु लांबून नुसत्याच अत्याचाराच्या दंतकथा रचल्या."
"मी तुम्हाला धर्माच्या आधारावर भारतीयांचे विभागीकरण थांबवण्याची विनंती करते. आम्ही तुम्हाला आमची एकी तोडू देणार नाही. या वर्षी 'रिझोल्यूशन डे' निमित्त मला आशा आहे की ब्रिटन आणि पाकिस्तानमध्ये राहणारे आमचे गुन्हेगार आंतरराष्ट्रीय मीडिया किंवा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मंचांवर माझ्या देशाची बदनामी करणे थांबवतील. दहशतवादामुळे हजारो काश्मिरी मातांनी आपले पुत्र गमावले आहेत. माझ्या काश्मिरी समुदायाला शांततेत जगू द्या. धन्यवाद आणि जय हिंद," असेही याना मीर म्हणाल्या.