रोम : इटलीतील एक डॉक्टर या वर्षअखेरीस जगातील पहिली मानवी शीर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणार आहेत. रशियन संगणकतज्ज्ञ वेलरी स्पिरिडोनोव्ह यांच्यावर ही शस्त्रक्रिया होणार आहे. स्पिरिडोनोव्ह स्नायू खराब करणाऱ्या ‘वर्डनिंग-हॉफमॅन डिजीज’ विकाराने ग्रस्त असून, सध्या व्हीलचेअरवर आहेत. या शस्त्रक्रियेनंतर ते प्रौढ जीवनात पहिल्यांदाच आपल्या पायांवर चालू शकतील, असे डॉक्टरांनी सांगितले. एका ब्रेन डेड व्यक्तीचे शीर त्यांच्यावर प्रत्यारोपित करण्यात येणार असून, डॉक्टर सर्जियो केनावेरो ही शस्त्रक्रिया करणार आहेत. शीर प्रत्यारोपित करण्यापूर्वी रक्तस्राव थांबविण्यासाठी ते अत्यंत थंड तापमानात ठेवण्यात येईल. या प्रक्रियेत १५० डॉक्टर आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. शरीराला नवे अंग स्वीकारता यावे यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाचविणे महत्त्वपूर्ण असते. कारण, त्यावरच कोणत्याही प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची यशस्वीता अवलंबून असते. त्याचबरोबर शस्त्रक्रियेनंतर कोणताही संसर्ग होणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागते. शिर शरीराला जोडताना डॉक्टरांना अनेक गुंतागुंतीला सामोरे जावे लागेल आणि अशा परिस्थितीत संसर्गाची शक्यता अधिक असेल, असे डॉक्टरांनी सांगितले. शीर प्रत्यारोपणाचे आतापर्यंतचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. ही शस्त्रक्रिया केवळ प्राण्यांवर करण्यात आली. तथापि, ती यशस्वी झाली नाही. ही शस्त्रक्रिया यापूर्वी माकड, श्वान आणि उंदरांवर करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रियेनंतर त्यांचा मृत्यू झाला होता.
यावर्षी होणार जगातील पहिले शीर प्रत्यारोपण
By admin | Published: April 06, 2017 4:44 AM