इस्लामाबाद - पाकिस्तानमधील एका विद्यापीठाने अजबर फर्मान काढले आहे. त्यानुसार येणाऱ्या 'व्हॅलेंटाईन डे'दिवशी सिस्टर डे साजरा करण्यात येणार आहे. इस्लामी रितीरिवाजांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी म्हटलंय. फैसलाबादच्या कृषी विश्व विद्यालयाचे कुलगुरू जफर इकबाल रंधवा यांनी याबाबत माहिती दिली.
पाकिस्तानच्या फैसलाबाद कृषी विश्व विद्यालयात 14 फेब्रुवारी या दिवशी विद्यालयातील मुलींना स्कार्फ आणि कपडे वाटून हा दिवस 'सिस्टर डे' म्हणून साजरा करण्यात येईल. जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्यात येतो. आपल्या प्रेमाची कुबली करण्याचा हा दिवस भारतातही मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केला जात आहे. मात्र, जगाचं एक असलं की पाकिस्तानचं दुसरंच असतं, असच काहीस दिसून येत आहे. इस्लामी रिती रिवाजांना प्रोत्साहन देण्यासाठी 14 फेब्रुवारीला सिस्टर्स डे साजरा करण्यात येत आहे, असे पाकस्तानमधील या विश्व विद्यालयाचे कुलगुरू रंधावा यांनी सांगितलंय. मात्र, विद्यापीठाचा हा प्रयोग कितपत यशस्वी होईल, हे सांगणे कठीण आहे. विशेष म्हणजे व्हॅलेंटाईन डे दिवशी सिस्टर्स डे साजरा केल्यास, पाकिस्तानमध्ये बहिणींना किती प्रेम मिळते, असा संदेश जगभरात जाईल, असा अजब तर्कही रंधवा यांनी काढला आहे. तसेच जगभरात बहिण भावाच्या प्रेमापेक्षा कुठलेही प्रेम मोठे नाही. पती-पत्नीच्या प्रेमापेक्षाही बहिण-भावाचे प्रेम मोठं असल्याचंही रंधावा यांनी म्हटलंय. दरम्यान, सोशल मीडियावर पाकिस्तानच्या विश्व विद्यालयातील या अजब-गजब फर्मानाची खिल्ली उडविण्यात येत आहे.