अदन - येमेन येथील अदन एअरपोर्टवर बुधवारी मोठा स्फोट झाला. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात किमान 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर डझनावर लोक जखमी झाले आहेत.
विशेष म्हणजे, या स्फोटाच्या काही वेळ आधीच सरकारच्या नव्या कॅबिनेट मंत्र्यांना घेऊन एक विमान येथे पोहोचले होते. हे मंत्री सौदी अरेबियातून (Saudi Arab) आले होते. महत्वाचे म्हणजे येमेनमध्ये दीर्घकाळापासून गृहयुद्ध (Civil War) सुरू आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, विमान लँड झाल्यानंतर काही वेळातच एअरपोर्टवर गोळीबाराचा आवाज ऐकू आला. पंतप्रधान मईन अब्दुलमलिक आणि राजदूत सईद अल जबर यांच्यासह कॅबिनेटच्या सदस्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आले आहे.
पीएम मईन यांनी ट्विट करत सुरक्षित असल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की 'आम्ही आणि सरकारमधील सदस्य अदनच्या अस्थायी राजधानीमध्ये आहोत आणि सर्व काही ठीक आहे. अदन एअरपोर्टला निशाणा बनवून करण्यात आलेला हा भ्याड दहशतवादी हल्ला म्हणजे, येमेन राज्य आणि याच्या महान जनतेविरोधात पुकारण्यात आलेल्या युद्धाचा भाग आहे.'