ऑनलाइन लोकमतसना (येमन), दि. ९ : येमेनची राजधानी सना येथे शोकसभेवेळी जमलेल्या शेकडो सर्वसामान्य लोकंवार सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली झालेल्या हवाई हल्ल्यात १४०हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर ५०० पेक्षा अधिक जण गंभीर असल्याचे वृत्त आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असून येमेनमधील हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला असल्याचे सांगितले जाते. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरु आहे. ढिगा-याखालून जखमींना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मृतदेहाची ओळख पटवणे कठीण आहे. मृतदेह छिनविछिन्न अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. स्थानिकांनी रक्तदानासाठी समोर यावे असे आवाहन येमेनमधील प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, शनिवारी सानामध्ये अंत्ययात्रेतील शोकसभेसाठी शेकडो स्थानिक सभागृहात जमले होते. यादरम्यान सभागृहावर हवाई हल्ला झाला. हॉलवर एकूण तीन बॉम्ब पडले. यातले दोन लागोपाठ तर तिसरा काही मिनीटांनी पडला. जोरदार आवाज आल्याने स्थानिकांनी सभागृहाजवळ मदतीसाठी धाव घेतली. मात्र पुन्हा हवाई हल्ला होण्याच्या भीतीने सुरुवातीला कोणी आत जायला तयार नव्हते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. येमेनमध्ये आरोग्य विभागाचे प्रवक्ते तमीम अल शमी यांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.