Houthi Rebel attacks UN employees: गाझावरील इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आक्रमक झालेले येमेनचे हुथी बंडखोर आता दहशतवाद्यांप्रमाणे हल्ले करून लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रेड सी म्हणजे तांबड्या समुद्रात व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करणाऱ्या हुथी बंडखोरांनी आता थेट संयुक्त राष्ट्रसंघालाच आव्हान दिले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुमारे नऊ कर्मचाऱ्यांना हुथी बंडखोरांनी ओलीस ठेवले आहे. हे कर्मचारी येमेनचे आहेत. वाढता आर्थिक दबाव आणि हवाई हल्ल्यांना तोंड देत हुथी बंडखोरांनी हे विचित्र पाऊल उचलले आहे. संयुक्त राष्ट्रसंघावरील या हल्ल्याचे हुथी बंडखोरांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे सांगितले जात आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की, इतर लोकांसह UN एजन्सींच्या सुमारे नऊ कर्मचाऱ्यांना बंदी बनवण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एका कर्मचाऱ्याच्या पत्नीलाही ओलीस ठेवण्यात आले आहे. मात्र, संयुक्त राष्ट्राने या प्रकरणी अद्याप काहीही स्पष्ट बोलण्यास नकार दिला आहे. हुथी बंडखोरांनी जवळपास दशकभरापूर्वी येमेनची राजधानी ताब्यात घेतली होती. तेव्हापासून ते सौदीच्या नेतृत्वाखालील देशांशी लढत आहेत. गाझा पट्टीत इस्रायल-हमास युद्धावरून हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील अनेक जहाजांना लक्ष्य केले आहे.
हुथी बंडखोर कोण आहेत?
सौदी अरेबियाच्या वाढत्या धार्मिक प्रभावाच्या निषेधार्थ हुथी बंडखोरी झाली. हुथी चळवळीचा पाया हुसेन बदरेद्दीन अल-हौथीने १९९० मध्ये घातला होता. हुसेन बदरेद्दीन अल-हुथी हा येमेनच्या झैदी शिया अल्पसंख्याक समुदायाचा आहे. हा समाज येमेनच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश आहे. २००४ मध्ये येमेनी सैनिकांनी हुसेनची हत्या केली होती. तेव्हापासून हुसेनचा भाऊ अब्दुल मलिक याने हुथी गटाचे नेतृत्व आपल्या हाती घेतले. येमेनच्या उत्तर भागात झैदी समुदायाचे वर्चस्व होते, परंतु १९६२-७०च्या गृहयुद्धात त्यांना बाजूला सारण्यात आले.