लोकमत-
माझ्या शरीरात कसा घुसला कोरोनाचा व्हायरस, मला खरंच माहीत नाही. पण तो प्रसंग अतिशय भयानक होता. तीन आठवड्यांच्या भयानक संघर्षानंतर या जीवघेण्या आजारातून मी(च) कसा काय वाचलो, तेही एक मोठं आश्चर्यच आहे.चीनच्या वुहानमधला 21 वर्षांचा कॉलेजवयीन युवक टायगर ये आपला अनुभव सागत होता. मी माझं मरण अक्षरश: माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि मरणाच्या दारातून अक्षरश: काही इंचावरुन परतही आलो आहे. मला कोणी तिथून खेचून आणलं, मी कसा काय वाचलो, मी असं काय पुण्य केलं होतं, की मी पुन्हा आज माझ्या सगळ्या लोकांसोबत आहे, सगळं काही स्वप्नवत आहे, पण मी जिवंत आहे, हे खरं आहे आणि पुर्णपणे बरा होऊन आज तुमच्याशी बोलतो आहे. टायगर सांगतो, माझी कहाणी तुम्हा सगळ्यांना सांगितलीच पाहिजे. कारण अनेकांना त्यामुळे वस्तुस्थिती कळेल, कोरोना होतो म्हणजे काय?, तो शेवटच्या स्टेजला जातो तेव्हा काय होतं आणि माणूस मरणाच्या दारातूनही कसा काय परत येऊ शकतो हेही कळेल. टायगर सांगतो. 17 जानेवारीचा दिवस. अचानक माझं अंग, मसल्स दुखायला लागले. कदाचित थोडा तापही असावा. मला वाटलं, असेल काही किरकोळ. मी थंडीतापाच्या नेहेमीच्या काही गोळ्या घेतल्या. त्यावेळेपर्यंत कोरोनाची मला काही माहितीही नव्हती. इतर लोकांचं पाहून नंतर मी मास्क वापरायला सुरुवात केली. 21 जानेवारीला चार दिवसांनंतरही माझं अंग दुखतच होतं, शेवटी मी वडिलांना फोन केला. त्यांनी मला ताबडतोब घरी परतायला सांगितलं. त्या दिवशी संध्याकाळी मी ताप मोजला. माइल्ड ताप होता. आई म्हणाली, रात्रीपर्यंत ताप उतरला नाही, तर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ. रात्री अकरापर्यंतही ताप उतरला नाही. शेवटी मी हॉस्पिटलमध्ये गेलो. अख्खं हॉस्पिटल भरलेलं होतं. मला फार आश्चर्य वाटलं नाही. कारण वुहानमधलं ते सर्वोत्तम हॉस्पिटल होतं आणि पेशंटची तिथे कायमच गर्दी असते. पण तिथली भयानक गर्दी पाहून मी दुसर्या हॉस्पिटलमध्ये जायचं ठरवलं. फुफ्फुसांच्या आजारावरचं ते हॉस्पिटल होतं. मध्यरात्रीच्या या वेळी तिथे एकही पेशंट नव्हता, पण माझा तो निर्णय किती अचूक होता, ते आज मला कळतंय. त्यांनी माझ्या काही टेस्ट घेतल्या. औषधं दिली. लक्षात घ्या, ज्या वुहानमधून कोरोनाचा प्रसार सुरू झाला, नेमक्या त्याच भागात मी राहात होतो. आई आणि वडील दोघही हेल्थ सेक्टरमध्ये काम करीत असल्यानं शहरात कोरोनाची लागण वाढायला लागल्याबरोबर त्यांनी मला होम क्वॉरण्टाइन केलं. चार दिवसांनंतर पुन्हा मला चेकअपसाठी नेण्यात आलं. यावेळी माझा खोकला बर्यापैकी वाढला होता. कफ पडत होता. माझी स्थिती दिवसेंदिवस खालावत होती. आता तर सगळी फुफ्फुसंही इन्फेक्टेड झाली होती. डॉक्टरांनी स्पष्टपणे काही सांगितलं नाही, पण मला कळून चुकलं होतं, आपल्या आयुष्याचा खेळ आता संपला आहे! नंतर दुसर्याच दिवसापासून माझा खोकला इतका वाढला की खोकताना पोट आणि पाठीतून भयानक कळा येत होत्या, पण खोकला थांबवताही येत नव्हता. ताप होताच. ‘जाण्यापूर्वी’ मी अध्यात्माचा आधार घेतला. देवाचा धावा सुरू केला. सोबत डॉक्टर प्रय}ांची पराकाष्ठा करीत होतेच. पुन्हा चमत्कार झाला. मला थोडं बरं वाटू लागलं. औषधं आणि तपासण्या सुरूच होत्या. चार फेब्रुवारीला पुन्हा काही तपासण्या. आता शेवटचा धक्का बसायचा होता! डॉक्टरांनी रिपोर्ट दाखवले. मी कोरोनामुक्त झालो होतो! माझ्यासमोर अनेकांना मरताना मी पाहिलं. पण मी वाचलो! कसा? खरंच मला माहीत नाही!.