न्यूयॉर्क : जर तुम्ही वाहतूक कोंडीत अडकलात तर रस्त्यावर योगासने करून वेळेचा सदुपयोग करू शकता. फ्लोरिडातील एका महिलेने असाच प्रयोग केला. वाहतूक कोंडी फुटायची चिन्हे नसल्याचे पाहून क्रिस्टिन जॉन्सन कारमधून उतरल्या आणि रस्त्यावरच योग मॅट अंथरून त्यांनी योगासने केली. रस्त्यावर योगासने करतानाचे छायाचित्र टिष्ट्वटरवर टाकून त्यांनी त्याखाली लिहिले की, मी अशा प्रकारे माझ्या डोक्यातून वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी रस्त्यावर भुजंगासन (कोबरा पोज) केले. त्यांच्या या उपायाची समाजमाध्यमांत (सोशल मीडिया) चर्चा रंगली आहे. त्याचे झाले असे की, ट्रकमुळे महामार्गावर दोन तास भीषण वाहतूक कोंडी झाली होती. क्रिस्टिन वर्दळीच्या मियामी महामार्गावरून कारने जात असताना हा प्रकार घडला. ‘मी कारच्या काचा खाली करून इंजिन बंद केले. मी जेथे होते तेथून दिसणारा देखावा अत्यंत मनोहारी होता. त्यामुळे मी रस्त्यावरच योगासने केली, असे क्रिस्टीनने लिहिले. क्रिस्टीन योगासने करीत असताना आसपासच्या लोकांनी कारमधून उतरून तिची छायाचित्रे घेतली. क्रिस्टीन मियामी न्यू टाइम्स ब्लॉगमध्ये कार्यरत आहे. आता तुम्हीच ठरवा, उद्या चालून तुम्ही वाहतूक कोंडीत अडकलात तर वेळ व्यतीत करण्यासाठी हा उपाय करणार का?
रस्त्यावरच केली योगासने
By admin | Published: May 13, 2017 12:09 AM