ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. 25 - अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून वर्णद्वेषाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे निर्दशनास येत आहे. आता न्यू यॉर्कमध्ये मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या शीख तरुणीला वर्णद्वेषाच्या वागणुकीचा सामना करावा लागला. मिळालेल्या माहितीनुासर, या शीख तरुणीवर वर्णभेदी टीका करत एका अमेरिकन नागरिकाने 'येथून निघून जा, तू या देशातील नाहीस' असा आरडाओरडा करायला सुरुवात केली. ही तरूणी मिडल-ईस्टची असल्याचा अमेरिकन व्यक्तिचा समज झाला होता.
राजप्रीत हीर असे या तरुणीचे नाव असून एका अमेरिकेन नागरिकाने तिला म्हटले की, 'तुझा या देशाची काहीही संबंध नाही. तू या देशाची नाही.' न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, राजप्रीत हीर ही सबवे ट्रेनने मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी जात होती. दरम्यान, एक अमेरिकन व्यक्ती तिच्यावर ओरडला. हीरने या घटनेचा व्हिडीओ न्यूयॉर्क टाइम्सला पाठवला. हीरने या व्हिडीओला 'दिस वीक इन हेट' असे कॅप्शन दिले आहे. न्यू यॉर्क टाइम्समध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेत वर्ण भेदभावाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या बातमीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
राजप्रीत हीरने सांगितले की, प्रवासादरम्यान मी माझा मोबाईल पाहत होते, तेव्हा अचानक ट्रेनमधील एका व्यक्तीने ओरडायला सुरूवात केली. मला विचारायला लागला की, तुला माहीत आहे का मरीन लूक काय असतो? तुला माहिती आहे का? ते लोक कसे दिसतात? त्यांनी या देशातील नागरिकांसाठी काय केले आहे? हे सगळे तुमच्यासारख्या लोकांमुळे होते, मला खात्री आहे की, तू लेबनानला परतशील. तू या देशाची नाहीस. यावेळी त्यानं अपशब्दाचाही वापर करत लेबनानपासून 50 किमी अंतरावरील एका दुसऱ्या शहरात तिचा जन्म झाला. पण, ते मिडल इस्टर्न शहर नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे, यावेळी ट्रेनमधील अन्य प्रवासांनी बघ्याची भूमिका न घेता, राजप्रीतला मदतीसाठी हात पुढे केला. यापूर्वीही कंसासच्या एका बारमध्ये झालेल्या गोळीबारात भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचीभोतला यांचा मृत्यू झाला होता. यानंतर एका भारतीय व्यावसायिकावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर दुस-याच दिवशी केंट येथे एका शीख बांधवावर गोळीबार झाला. ‘तुमच्या देशात चालते व्हा,’ म्हणत एका माथेफिरूने त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात दीप राय (39) हे जखमी झाले होते. दीप राय हे वॉशिंग्टन प्रांताच्या केंटमध्ये आपल्या घराबाहेर वाहनाची दुरुस्ती करत होते. याच वेळी चेहरा झाकलेला एक व्यक्ती तिथे आला आणि दीप राय यांच्यावर गोळीबार केला.