अबू धाबी: आखाती देशात काम करणाऱ्या किंवा फिरायला गेलेल्या लोकांना करोडो रुपयांची लॉटरी लागल्याच्या बातम्या येत असतात. काही महिन्यांपूर्वी केरळमधील रिक्षावाल्याला देखील लॉटरी लागली होती. आता ही एका भारतीयाला लॉटरी लागली आहे. अबू धाबीमध्ये आयोजित केलेल्या बिग टिकट ड्रॉ सीरीज नंबर 250 मध्ये एका भारतीयाला थोडी थोडकी नव्हे ४४ कोटींची लॉटरी लागली आहे.
बंगळुरूमध्ये राहणाऱ्या अरुण कुमार वाटक्के कोरोथ याने २२ मार्चला या लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. त्याचा तिकीट नंबर 261031 हा होता. या नंबरला दोन कोटी दिरहमची लॉटरी लागली आहे. याचे भारतीय मुल्य 44,77,10,932 रुपये होते. शोच्या होस्टने त्याने तिकीट खरेदीवेळी दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन केला व तुम्ही ४५ कोटी जिंकलात असे सांगितले. यावर अरुण कुमारने काहीच प्रतिक्रिया दिली नाही व फोन कट केला.
ड्रॉ जिंकल्याचे सांगणारा आवाज ऐकल्यासारखा वाटल्याने त्याने त्यावर विश्वास ठेवला नाही. कोणीतरी भंकस करतोय असे समजून त्याने फोन ठेवून दिला. इकडे ड्रॉचे आयोजक कोड्यात पडले आहेत. आता शो चे आयोजक त्याला पुन्हा एकदा फोन करून याची माहिती देणार आहेत.
अरुण कुमारशिवाय या ड्रॉमध्ये आणखी एका भारतीयाला लॉटरी लागली आहे. सुरेश मथनला १ लाख दिरहम मिळाले आहेत. ओमानमधील भारतीय नागरिक मोहम्मद शफीकला 90 हजार दिरहम म्हणजेच २० लाख रुपये मिळणार आहेत. पहिले तिघेही भारतीयच आहेत.