संयुक्त राष्ट्र : आंतरराष्ट्रीय विधि आयोगाच्या सदस्यत्वासाठी संयुक्त राष्ट्राच्या (युनो) आमसभेत झालेल्या अटीतटीच्या लढतीत तरुण भारतीय वकिलाने आशिया-पॅसिफिक गटात सर्वाधिक मते मिळवून बाजी मारली. आंतरराष्ट्रीय विधि आयोग ही युनोची विधितज्ज्ञांची सर्वोच्च संस्था आहे. आमसभेने आंतरराष्ट्रीय विधि आयोगाचे सदस्य म्हणून ३४ लोकांची निवड केली असून, त्यात भारताच्या अनिरुद्ध राजपूत यांचा समावेश आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय कायदे आणि त्यांच्या वर्गीकरणाच्या क्रमिक विकासाची जबाबदारी सांभाळते. नवनियुक्त सदस्य जानेवारी २०१७ पासून कार्यभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे. आफ्रिकी, आशिया प्रशांत, पूर्व युरोपियन, लॅटिन अमेरिकन आणि कॅरेबियन तसेच पश्चिम युरोपियन देश, अशा ५ भौगोलिक गटांतून सदस्यांची निवड करण्यात आली. आशिया पॅसिफिक गटासाठी झालेल्या निवडणुकीत ३३ वर्षीय राजपूत यांना सर्वाधित १६० मते मिळाली. जपानचे शिन्या मुरासे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना १४८ मते मिळाली. जॉर्डनचे महमूद दैफल्लाह हमौद आणि चीनचे हुईकांग हुआंग यांना प्रत्येकी १४६ मते मिळाली. कोरियाच्या के की गाब पार्क यांना १३६, कतारच्या अली बिन फेतैस अल मार्री यांना १२८ आणि व्हिएतनामच्या होंग थाओ एनगुयेन यांना १२० मते प्राप्त झाली. या ७० वर्षे जुन्या संस्थेतील सर्वात तरुण सदस्यांत राजपूत यांचा समावेश असून, आयोगाचे ते पहिले भारतीय सदस्य आहेत, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायम प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले.
युनोच्या सर्वोच्च विधि संस्थेवर युवा भारतीय वकिलाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2016 6:10 AM