वॉशिंग्टन : मद्यपानाचा मध्यमवयीन, वयोवृद्धांपेक्षा युवकांच्या आरोग्याला सर्वाधिक धोका असल्याचा निष्कर्ष एका जागतिक स्तरावरील पाहणीतून काढण्यात आला. या संशोधनावर आधारित लेख ‘लॅन्सेट जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
मद्यपानामुळे कोणत्या वयोगटाच्या आरोग्याला सर्वाधिक धोका आहे यासंदर्भात पहिल्यांदाच भौगोलिक प्रदेश, वय, लिंग आदी गोष्टी लक्षात घेऊन या प्रकारची पाहणी करण्यात आली. १५ ते ३९ वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या आरोग्यावर मद्यपानामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो. ४० वर्षे व त्यापुढील वयोगटातील लोकांच्या आरोग्यास दररोज अल्प प्रमाणात मद्यपान केल्याने काही फायदे होतात. त्यांना हृदयविकार, स्ट्रोक, मधुमेह हे विकार होण्याचा धोका काहीअंशी कमी होतो. विविध देशांमध्ये तेथील नागरिक किती प्रमाणात मद्यपान करतात याचा अंदाज घेऊन २०२० साली १.३४ अब्ज लोकांनी किती प्रमाणात मद्यपान केले असावे, याची शास्त्रज्ञांनी मोजणी केली.
अल्प मद्यपान उपकारकअमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठातील प्राध्यापक एमॅन्यूएला गाकिडौ यांनी सांगितले की, तरुणांनी मद्यपान करू नये. ४० वर्षे व त्यापुढील वयोगटाच्या व्यक्तींनी कमी प्रमाणात केलेले मद्यपान त्यांच्या आरोग्यासाठी उपकारक आहे.
हृदयविकारग्रस्तांना होईल फायदा४० वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील जे लोक हृदयविकाराने आजारी आहेत, त्यांना अल्प प्रमाणात केलेले मद्यपान आरोग्यासाठी फायदेशीर ठरल्याचा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे.
युवक अधिक दुर्घटनाग्रस्तजगातील विविध प्रदेशांमध्ये १५ ते ३९ वर्षे वयोगटातील लोक अधिक प्रमाणात मद्यपान करतात व त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे आढळून आले. मद्यधुंद अवस्थेत दुर्घटना होऊन जखमी झालेल्यांमध्ये या वयोगटाच्या लोकांची संख्या अधिक होती.