- मयूर पठाडेतुमचं वजन का वाढतंय, तुमची शुगर लेव्हल हाय का होतेय, तुमच्या शरीरातलं कोलेस्टरोॅल का वाढतंय? ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम्स तुमची चिंता का वाढवतेय? हृदयविकाराची शक्यता तुमच्यात जास्त का आहे?..कधी विचार केलाय या प्रश्नांचा? गेलात कधी या प्रश्नांच्या मुळाशी? बघा तपासून.. कदाचित या साऱ्या प्रश्नांचं एकच उत्तर असू शकेल, ते म्हणजे तुमच्या आहाराच्या पद्धतीत. बघा, विचारा स्वत:ला, रात्रीचं जेवण तुम्ही उशिरा घेता का?.. तसं असेल तर तुमच्या या साऱ्या प्रश्नांचं उत्तर आणि प्रॉब्लेम एकच आहे.. लेट नाईट इटिंग!यासंदर्भात अलीकडेच एक मोठ्ठा अभ्यास करण्यात आला. अमेरिकेतील पेनसिल्वानिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला.
काय केलं शास्त्रज्ञांनी?त्यासाठी शास्त्रज्ञांनी सरळ दोन गट केले आणि त्यांच्या आहाराचा, त्यांच्या वजनावर, त्यांच्या प्रकृतीवर काय परिणाम होतो याचा बारीक अभ्यास केला.यातल्या पहिल्या गटाला त्यांनी दोन महिने सकाळी आठ ते रात्री सात या वेळांत ठरलेल्या वेळी आहार दिला. त्यात तीन जेवण आणि दोन स्नॅक्सचा समावेश होता. दुसऱ्या गटावरही दोन महिन्यांसाठी त्यांनी हाच प्रयोग केला. त्यांच्या खाण्याच्या वेळा मात्र बदलल्या. या गटाला त्यांनी दुपारी बारा ते रात्री अकरा, या दरम्यान पहिल्या गटाप्रमाणेच, म्हणजे तीन वेळा जेवण आणि दोनदा स्नॅक्स दिले.
शास्त्रज्ञांना आढळून आलं, ज्यांनी आपला सगळा आहार रात्री सातच्या आत घेतलेला आहे, त्यांच्या प्रकृतीवर कोणताही नकारात्मक परिणाम आढळून आला नाह. मात्र ज्यांनी रात्री उशिरा जेवण घेतले आहे, त्यांच्या वजनात तर वाढ झालीच, पण इतरही धोक्याचे इशारे त्यांना जाणवले.रात्री उशिरा जेवण करण्याचे तोटे तर स्पष्टपणे या अभ्यासात दिसून आलेच, पण त्याचबरोबर आणखीही एक निरीक्षण संशोधकांनी केलं, ते आपल्या सर्वांसाठीच फार महत्त्वाचं आहे. आपल्या खाण्यावर आणि खाण्याच्या वेळांवर तर आपलं नियंत्रण हवंच, पण तुम्ही जर आपलं रात्रीचं, म्हणजेच शेवटचं जेवण जर लवकरात लवकर अथवा रात्री सात वाजेच्या आत संपवलं, तर त्याचा तुम्हाला फायदाच होईल. आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या त्यातून दूर होतील.
‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास सुखसमृद्धी आरोग्य लाभे’ ही जी आपल्याकडची परंपरागत म्हण आहे, त्यात खूचप तथ्य आहे, हे शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा शोधून काढलं आहे.त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि किमान आपलं रात्रीचं जेवण तरी वेळेवर घ्या, जेवणात आणि झोपण्याच्या वेळेत पुरेस अंतर राखा.. आरोग्याच्या तुमच्या साऱ्या कटकटी नक्कीच दूर होतील..