नवी दिल्ली - आताच्या स्पर्धेच्या युगात क्वचितच माणुसकीचे दर्शन घडतं. सध्याची परिस्थिती पाहून माणुसकी हरवत चाललीय की काय ? अस प्रश्नच उपस्थित झाला आहे. आपले विचार निष्ठुर होत जाताहेत का, अशीही भीती निर्माण होत आहे. कित्येक प्रसंगी आपण केवळ बघ्याच्या भूमिकेतच तमाशा पाहत बसतो. अन्याय, चूक, अयोग्य गोष्टींविरोधात आपण ठाम उभे राहत नाहीत. अशा भयावह वर्तमान स्थितीत आज माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर दोन तरुणांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या दोन तरुणांनी निर्वस्त्र फिरणा-या एका छोट्याशा मुलासाठी असं काही काम केलंय की तुमचं हृदय भावनेनं भरुन आल्याशिवाय राहणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेले फोटो फिलिपिन्समधील असून येथे राहणारा सेग्गो लोबेरेस आणि त्याचा मित्र जोश रेबनल एके दिवशी असंच मज्जामस्ती करण्याच्या उद्देशानं कारमधून सफर करण्यासाठी बाहेर पडले होते. सफर करत असताना त्यांची नजर एक मुलावर पडली. हा चिमुरडा भर पावसात निर्वस्त्र रस्त्यावर फिरत होता. मुलाची परिस्थिती पाहताच जोश रेबनलनं आपल्या कारमधून एक शर्ट काढले आणि त्या मुलाला घातलं. हे शर्ट चिमुरड्यासाठी फारच मोठे होते, पण पावसामध्ये त्याच्या शरीराच्या संरक्षणासाठी पुरेसे होते.
जोश लहान मुलाच्या अंगावर मायेने शर्ट घालत असतानाचे भावनिक क्षण सेग्गोनं आपल्या मोबाइलमध्ये कैद केले आणि फेसबुकवर शेअर केले. या चिमुरड्याला केलेल्या मदतीवरुन या दोघांवर कौतुकाचा वर्षाव होतोय.