चीनमध्ये कोरोना महामारीने थैमान घातले आहे. असे असतानाच चीन देशातील कोरोना बाधितांची आणि मृतांची आकडेवारी लपवत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही आकडेवारी लपवण्यासंदर्भात चीनवर टीका केली आहे. यातच, आता चीनमधील तरुण वर्ग स्वतःहून स्वतःला कोरोना संक्रमित करत असल्याचे वृत्त आहे. यात अनेक सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य नागरिकांचाही समावेश आहे. अनेकांनी तर सुट्ट्या रद्द कराव्या लागू नयेत, म्हणून स्वतःला कोरोना संक्रमित करून घेतल्याचे वृत्त आहे. चीनमधील लोक असे का करत आहेत? यासंदर्भात एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
चीनमध्ये कोरोनाचापासून स्वतःचा बचाव करणे जवळपास अशक्य झाले आहे. वृद्ध लोकांना कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे. अशा स्थितीत हतबल झालेले चिनी नागरिक आता स्वतःहून संक्रमित होऊ लागले आहेत. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या सुट्ट्यांच्या प्लॅनिंगमध्ये बदल करावा लागू नये, म्हणून सेलिब्रिटीपासून ते अनेक चिनी तरूण स्वतःहून कोरोना संक्रमित होत आहेत. महत्वाचे म्हणजे, कोरोनासंदर्भात काही बोलणे, संबंधितांसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी धोक्याचे ठरू शखते, अशी भीती काहींना वाटते. यामुळे अनेकांनी यासंदर्भात उघडपणे बोलणे टाळले.
अँटीबॉडी विकसित करण्याची इच्छा - बीबीसीसोबत बोलताना, अनेक तरुणांनी सांगितले की ते स्वत:हून संक्रमित होत आहेत. कारण एकदा नव्या व्हेरिअंटने सक्रमित झाल्यानंतर, त्यांच्या शरीरात अँटीबॉडी विकसित होईल. यामुळे नंतर ते आजारी पडणार नाहीत. विशेष म्हणजे, बाहेर फिरायला गेल्यानंतर आजारी पडू नेय, म्हणून आपण स्वतःला संक्रमित करून घेतल्याचेही शंघायमधील एका व्यक्तीने म्हटले आहे. याशिवाय, नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या संगितांच्या कार्यक्रमावेळी आजारी पडण्याची वेळ येऊ नये म्हणून, चीनमधील गायिक जेन झांग हिने डिसेंबरमध्ये आपण स्वतःहून संक्रमित झालो आहोत, असे म्हटले होते.