संयुक्त राष्ट्र : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील चर्चेपूर्वी दुसऱ्या आघाडीवर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र (युनो) सुरक्षा परिषदेत पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवत हा मुद्दा सोडविण्यासाठी इस्लामी सहकार्य संघटनेच्या (ओआयसी) मध्यस्थीची मागणी केली. प्रादेशिक संघटना आणि समकालीन जागतिक सुरक्षा आव्हानांवर मंगळवारी एका खुल्या चर्चेदरम्यान संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या कायम प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी वरील मागणी केली. त्या म्हणाल्या की, ५७ सदस्यीय ओआयसी जागतिक शांतता आणि समृद्धीतही योगदान देऊ शकते. सामूहिकरीत्या तसेच संयुक्त राष्ट्रासोबतच्या सहकार्याद्वारे पॅलेस्टाईन, मध्यपूर्व आणि जम्मू-काश्मीर वाद सोडविण्याची या संघटनेत क्षमता आहे. संयुक्त राष्ट्राने ओआयसीला मध्यस्थी, वादांवर तोडगा काढणे, शांतता राखणे, मानवीय साहाय्य व विशेष करून स्थलांतरित, संघर्ष व दहशतवादामागील मूळ कारणांचे निराकरण करणे आदी क्षेत्रात सहकार्य करण्यास प्रोत्साहन द्यायला हवे, असेही त्या म्हणाल्या. (वृत्तसंस्था)
युनोत पुन्हा वाजविले काश्मीरचे तुणतुणे
By admin | Published: August 19, 2015 10:58 PM