टोकियो : जपानचे युवराज नारुहितो हे बुधवारी औपचारिकरीत्या जपानचे नवे सम्राट बनले आहेत. वयोवृद्ध पिता आकिहितो यांनी मंगळवारी पदत्याग केल्यानंतर नारुहितो विधिवत राजसिंहासनावर विराजमान झाले. दरम्यान, देशाला संबोधित करताना केलेल्या पहिल्या भाषणात नारुहितो यांनी जागतिक शांततेसाठी संकल्प करतानाच देशवासीयांच्या पाठीशी सदैव उभा ठाकणार असल्याची ग्वाही दिली. मी संविधानाला अनुसरून काम करेल.
माझे विचार नेहमी माझ्या नागरिकांसाठीच असतील. मी त्यांच्या बाजूने उभा ठाकेन. माझ्या कार्यात वडील आकिहितो यांची झलक दिसेल, असे ते म्हणाले. जपानचे अतिप्राचीन साम्राज्य आकिहितो यांनी जनतेच्या निकट आणल्याचे मानले जाते. मावळते सम्राट ८५ वर्षीय आकिहितो यांनी अंतिम भाषणात देशवासीयांचे मनापासून आभार मानले. मी जपान आणि संपूर्ण जगातील नागरिकांच्या शांती आणिखुशीसाठी प्रार्थना करतो, असे ते म्हणाले.
मंगळवारी मध्यरात्रीनंतर नव्या सम्राटाची घोषणा करण्यात आली. जपानच्या इतिहासात २०० वर्षांपेक्षा जास्त काळानंतर एखाद्या सम्राटाने हयात असताना पदत्याग केला आहे. ५९ वर्षीय नारुहितो यांनी बुधवारी सकाळी १० मिनिटे चाललेल्या औपचारिक समारंभात ‘क्रिसेंथमम थ्रोन’ (राजसिंहासन) ग्रहण केले. त्यावेळी त्यांच्या पत्नी मसाको यांच्यासह राजघराण्यातील महिलांना प्रवेश नव्हता. नारुहितो यांच्या पदग्रहणासोबतच जपानमध्ये राजेशाहीच्या नव्या युगाचा ‘रेईवा’(सुंदर सौहार्द) प्रारंभ झाला.
इम्पेरियल पॅलेसमधील पाईन रुममध्ये नारुहितो यांना शाही तलवार, शाही आभूषणे, राज्याची मोहोर आणि वैयक्तिक मोहोर सोपविण्यात आली. या संपूर्ण विधीच्या वेळी पंतप्रधान शिजो आबे यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला सदस्य उपस्थित होती.
जपानचे १२६ वे सम्राट...नारुहितो हे जपानचे १२६ वे सम्राट असून ते शनिवारी पुन्हा देशाला संबोधित करतील. सम्राट नारुहितो आणि सम्राज्ञी मसाको २२ ऑक्टोबर रोजी पारंपरिक राजेशाही पोशाखात राजधानीचा दौरा करणार असून, त्यांना विविध देशातील नेते आणि अन्य राजपरिवारातील सदस्य शुभेच्छा देतील. नारुहितो आणि मसाको हे पती-पत्नी ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकले आहेत. जपानमध्ये महिलेला राजसिंहासन दिले जात नाही. त्यामुळे नारुहितो यांची कन्या राजकुमारी अकियो (१७) हिला सम्राटपद मिळणार नाही. नारुहितो यांच्या पुतण्याकडे हे पद जाईल.