नवी दिल्ली - मुस्लीम धर्माचा प्रचारक झाकीर नाईकला लव जिहाद प्रकरणात आरोपी बनविण्यात आले असून त्यासह पाकिस्तानमधील आणखी दोघांवरही आरोप ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून झाकीर नाईकला ताब्यात घेण्यासाठी तपास सुरू आहे. चेन्नईतील एका हाय प्रोफाईल लव्ह जिहादप्रकरणी हे आरोप ठेवण्यात आले आहेत.
चेन्नईतील एका बड्या व्यापाऱ्याची मुलगी आणि बांग्लादेशमधील माजी खासदार शेखावत हुसैन बकुल यांचा मुलगा नफीसचा या प्रकरणात समावेश आहे. या खासदारांचा संबंध माजी पंतप्रधान खालिदा जिया यांच्या बांग्लादेश नॅशनल पार्टीसोबत आहे. चेन्नईतील व्यापाऱ्याची मुलगी आणि बांग्लादेशच्या राजकीय नेत्याच्या मुलगा यांचा लंडनमध्ये विवाह झाला असून एआयएकडून त्याचा तपास सुरू आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, देशातील टॉप तपास यंत्रणांनी झाकीर नाईक व अमेरिकेतील मूळ पाकिस्तानातील कट्टर धर्मप्रचारक यासीर कादी व नौमान अली यांची नावे याप्रकरणात आरोपी म्हणून घोषित केली आहेत.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी मे महिन्यात चेन्नईतील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये, लंडनमध्ये शिक्षण करणाऱ्या त्यांच्या मुलीला इस्लाम धर्म स्विकारण्यास भाग पाडल्याचे त्यांनी म्हटले. लंडनमध्ये इस्लाम धर्माच्या कट्टरपंथीयांच्या संपर्कात मुलगी आली होती, त्यानंतर तिला धर्म स्विकारण्यास जबरदस्ती करण्यात आली. तसेच, लंडनमधून तिचे अपहरण करुन तिला बांग्लादेशला नेण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणात झाकीर नाईकचेही नाव घेण्यात आले आहे. यापूर्वीही दिल्लीतील सीएए विरोधात झालेल्या दंगलीतही झाकीरचा सहभाग असल्याचं सांगण्यात येत होतं. दिल्लीतील दंगलीत अटक झालेला आरोपी चारवेळा मलेशियाला गेला होता, तेथे झाकीरच्या संपर्कात होता, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.