Zakir Naik in Pakistan: भारतातून पळून गेलेला फरार इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक सोमवारी पाकिस्तानातील इस्लामाबादेत पोहोचला. तो पाकिस्तानातील इस्लामाबाद सह कराची आणि लाहोर या मोठ्या शहरांमध्ये भाषणे देणार आहे. भारताविरोधात गरळ ओकण्याची सवय असलेला झाकीर नाईक २८ ऑक्टोबरला इस्लामाबादमधील भाषणासह आपला दौरा संपवणार आहेत. पाकिस्तानच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने ही माहिती स्पष्ट झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, झाकीर नाईक अनेक शहरांमध्ये शुक्रवारच्या नमाज सभांना संबोधित करणार आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाच्या युवा कार्यक्रमाचे अध्यक्ष राणा मशहूद, धार्मिक व्यवहार विभागाचे संसदीय सचिव शमशेर अली मजारी, धार्मिक व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सय्यद डॉ. अत्ता-उर-रहमान आणि इतरांनी झाकीर नाईकचे न्यू इस्लामाबाद विमानतळावर स्वागत केले.
झाकीर नाईकने त्याच्या सोशल मीडिया हँडलद्वारे त्याच्या दौऱ्याची घोषणा केली आणि पाकिस्तानमध्ये दिल्या जाणाऱ्या सार्वजनिक भाषणांचा तपशीलही शेअर केला. तो ५ ऑक्टोबरला आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. पहिला कार्यक्रम कराची, नंतर लाहोर आणि नंतर इस्लामाबाद असा कार्यक्रम असणार आहे. याआधी सोमवारी झाकीर नाईकने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये त्याने आपली सार्वजनिक भाषणे का कमी केली हे स्पष्ट केले होते.
झाकीर नाईक म्हणाला की, तुम्ही मोजले तर सार्वजनिक भाषणांना उपस्थित राहणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढली आहे. मी शहरात जायचो आणि कधी पाच तर कधी १५ दिवस प्रेझेंटेशन द्यायचो आणि २०-२० दिवस भाषणं द्यायचो. पण आजकाल मी एका देशात जाऊन फक्त वीकेंडलाच भाषण देतो. त्या दोन सत्रांतील एकूण उपस्थिती १० भाषणांपेक्षा कितीतरी जास्त असते, अशी त्याने माहिती दिली.
दरम्यान, झाकीर नाईक द्वेषपूर्ण भाषणाद्वारे लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप केला. द्वेष पसरवण्याच्या आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांसह त्याला भारतात कायदेशीर खटल्यांचा सामना करावा लागला. त्यानंतर तो २०१६ मध्ये मलेशियाला पळून गेला आणि तेव्हापासून तो फरार आहे.