क्वालालंपूर : वादग्रस्त धर्मगुुरू डॉ. झाकीर नाईक याच्या कृतीमुळे देशहिताला बाधा येत असल्यास त्याला दिलेले कायमस्वरूपी नागरिकत्व वेळप्रसंगी रद्दही करू, असा इशारा मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महातीर मोहम्मद यांनी दिला आहे.मलेशियातील अल्पसंख्याकांबद्दल झाकीर नाईकने आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुरू असलेल्या पोलीस तपासातून जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असेही सांगून महातीर मोहम्मद म्हणाले की, झाकीर नाईक याच्या भाषणांनी मलेशियामध्ये वंशविद्वेष पसरत असेल, तर त्याची सरकार गंभीर दखल घेईल.मलेशियातील सलोख्याचे वातावरण आम्ही कोणत्याही परिस्थितीत बिघडू देणार नाही. मलेशियातील भारतीयांची महातीर सरकारपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अधिक निष्ठा आहे. मलेशियात स्थायिक झालेले चिनी लोक हे बराच काळ राहिलेल्या पाहुण्यांसारखे आहेत.या मूळ चिनी लोकांनी मलेशिया सोडून जाण्यास मी प्रवृत्त करण्याच्या आधीच त्यांनी आपल्या मायदेशात निघून जावे, अशी भडक वक्तव्ये झाकीर नाईक यांनी केली होती. मलेशियाच्या कायदा-सुव्यवस्थेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्या देशाचे गृहमंत्री मुहिउद्दीन यांनी दिला होता. (वृत्तसंस्था)
झाकीर नाईकचे मलेशियाचे नागरिकत्व वेळप्रसंगी रद्द करू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 4:44 AM