ऑनलाइन लोकमत
ढाका, दि. १० : भारतात वादग्रस्त ठरलेले प्रवचनकार झाकीर नाईक यांनी स्थापन केलेल्या पीस टीव्हीच्या प्रसारणावर बांगलादेश सरकारने बंदी घातली आहे. ढाक्यामध्ये १ जुलैच्या रात्री २२ जणांना ठार मारणाऱ्या दहशतवाद्यांपैकी दोन जणांनी नाईक यांच्या धार्मिक प्रवचनांतून आम्हाला ‘प्रेरणा’ मिळाल्याचे म्हटले होते. त्यानंतर पीस टीव्ही व नाईक यांच्या धार्मिक प्रवचनांवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. पीस टीव्ही बांगलावर बंदीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या कायदा आणि सुव्यवस्था समितीच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उद्योगमंत्री अमिर हुसेन अमू होते. बैठकीस वरिष्ठ मंत्री आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.
नाईक यांनी शुक्रवारच्या प्रार्थना प्रवचनांमध्ये कोणती प्रक्षोभक वक्तव्ये केली होती का याचीही पाहणी केली जाणार आहे, असे अमू वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. २० ते २५ वयोगटातील दहशतवाद्यांनी २२ जणांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. मृतांत बहुतेक विदेशी होते. सरकारने देशातील इमामांना दहशतवाद आणि अतिरेकवाद इस्लामने नाकारला असल्याच्या मूळ शिकवणुकीची माहिती देणारी प्रवचने देण्याचे आवाहन केले आहे, असेही ते म्हणाले.
झाकीर नाईक यांची २२ जणांच्या हत्याकांडामध्ये काही भूमिका होती का याची बांगलादेशच्या गुप्तचर यंत्रणा चौकशी करीत आहेत. नाईक आमच्या सुरक्षा यंत्रणांच्या नजरेखाली आहेत. नाईक यांच्या बांगलादेशातील आर्थिक व्यवहारांचीही चौकशी होणार आहे. ब्रिटन आणि कॅनडाने तर
अनेक वर्षांपूर्वीच झाकीर नाईक यांना देशात येण्यास बंदी घातली आहे. मलेशियाने त्यांच्या भाषणांतून आंतरवंशीय तणाव निर्माण होऊ शकतो या भीतीतून त्यांच्या भाषणांवर बंदी घातली आहे. त्यांची नावे द्या : सलग दहा दिवस गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे द्या, असे आदेश बांगलादेश सरकारने सगळ्या शिक्षण संस्थांना रविवारी दिले आहेत. कॅफेवरील हल्ल्यांत सहभागी असलेल्या अतिरेक्यांपैकी काही जण हे घरून पळून जाऊन दहशतवाद्यांच्या गटात सहभागी झाल्याची वृत्ते आल्यानंतर हा आदेश देण्यात आला आहे.डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘पीस टीव्ही’च्या प्रसारणास भारतात परवानगी नाही. तरीही काही केबल आॅपरेटर या वाहिन्यांचे अवैध प्रसारण करतात अशा तक्रारी आल्याने केबल आॅपरेटरनी ही वाहिनी बंद करावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिला आहे. या वाहिन्यांवरील चिथावणीखोर धार्मिक प्रचाराने भारतातही अनेक तरुणांची माथी भडकल्याची उदाहरणे समोर आली आहेत.माझी ‘मीडिया ट्रायल’ : झाकीर नाईक यांनी आपल्या फेसबूक पेजवर शनिवारी एक नवे टिष्ट्वटर हॅण्डल सुरू केले व आपल्याविरुद्ध सुरू असलेल्या ‘मीडिया ट्रायल’मध्ये तमाम मुस्लीम बंधू-भगिनींनी आपल्या पाठीशी उभे राहावे व सत्य जगापुढे येण्यास मदत करावी, असे आवाहन केले.
दहशतवादा संदर्भातल्या झाकीर नाईकच्या वक्तव्यांवर केंद्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेची नऊ पथके त्याशिवाय गुप्तचर यंत्रणा आणि अन्य तपास यंत्रणा झाकीर नाईकच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत. विशेष पथके त्याच्या भाषणाच्या चित्रफितींमधील शब्द न शब्द तपासत आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार चार पथके फुटेज आणि भाषणांच्या सीडी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आली आहेत. तीन टीम्स सोशल साईटसवर लक्ष ठेऊन आहेत आणि दोन टीम्स नाईकच्या फेसबुक पोस्टवर लक्ष ठेऊन आहेत. प्राथमिक तपासात नाईकची भाषणे चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह असल्याचे समोर आले आहे.