रशियात घुसून हल्ले करू, झेलेन्स्की यांनी केला निर्धार; हवाई तळांवर हल्ल्यांसाठी मागितली अमेरिकेकडे मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 01:59 PM2024-09-02T13:59:07+5:302024-09-02T13:59:30+5:30
Russia Ukrain War: रशियात घुसून हल्ले करण्यासाठी युक्रेनने अमेरिकेची मदत मागितली आहे. राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, ‘जोवर रशियाच्या हवाई तळांसह लष्करी तळांवर युक्रेन हल्ला करणार नाही तोवर हे युद्ध थांबणार नाही.
किव्ह - रशियात घुसून हल्ले करण्यासाठी युक्रेनने अमेरिकेची मदत मागितली आहे. राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे की, ‘जोवर रशियाच्या हवाई तळांसह लष्करी तळांवर युक्रेन हल्ला करणार नाही तोवर हे युद्ध थांबणार नाही. यासाठी मित्रराष्ट्रांचे मन वळवण्यासाठी रोज चर्चा सुरू आहे. युक्रेनच्या रक्षणासाठी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र पुरवठ्यासह त्याच्या वापराची परवानगी सध्या आवश्यक आहे.’
झेलेन्स्की सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांची भेट घेणार असून या दौऱ्यात ते युक्रेनच्या विजयासाठी ठरवलेली आपली योजना त्यांच्यासमोर मांडतील. अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षात ६ ऑगस्टला युक्रेनने प्रथमच रशियात घुसून कुर्स्कवर ताबा मिळविला होता. तेव्हापासून युक्रेन वरचढ ठरत आहे.
युक्रेनकडून आजवरचा सर्वात मोठा हल्ला
- युक्रेनने शनिवारी रात्री मास्कोवर ड्रोनने आजवरचा सर्वात मोठा हल्ला केला.
- हा हल्ला आपल्या हवाईदलाने परतावून लावत १५८हून अधिक ड्रोन पाडल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी केला.
- कुर्स्क भागात ४६ ड्रोन नष्ट करण्यात आले. ब्रायन्स्क भागात ३४ तर वोरोनेझ भागात २८ ड्रोन नष्ट करण्यात आल्याचे रशियाने म्हटले आहे.