अमेरिकेची मदत सुरु ठेवावी असे वाटत असेल तर युक्रेनने मौल्यवान खनिजे अमेरिकेला त्या प्रमाणात पुरवावीत, असा प्रस्ताव ट्रम्प यांनी युक्रेनसमोर ठेवला होता. तो युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाकारला आहे. यामुळे ट्रम्प आता कोणते पाऊल उचलतात याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
झेलेन्स्की यांनी आपल्या मंत्र्यांना तसे आदेश दिले आहेत. युक्रेनच्या दुर्मिळ खनिजांपर्यंत अमेरिका पोहोचू शकणार नाही, हे पडताळून घ्या. अशा कोणत्याही समझोत्यावर हस्ताक्षर करू नका. कारण हा प्रस्ताव अमेरिकेच्या हितावर केंद्रीत आहे. तो आमचे, आमच्या हितांचे रक्षण करणारा नाही, असे आपण आपल्या मंत्र्यांना सांगितल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी झालेल्या म्युनिच सुरक्षा संमेलनातील अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस आणि झेलेन्स्की यांच्यात बैठक झाली. यावेळी चर्चेत अमेरिकेने हा प्रस्ताव ठेवला होता. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी देखील मला माझा पैसा परत हवा आहे, असा इशारा झेलेन्स्की यांना दिला होता.
अमेरिकेची मदत सुरु ठेवावी असे वाटत असेल तर युक्रेनने मौल्यवान खनिजे अमेरिकेला त्या प्रमाणात पुरवावीत, असा प्रस्ताव ट्रम्प यांनी युक्रेनसमोर ठेवला होता. युक्रेन कोणत्याही दिवशी रशियाचा होऊ शकतो. रशियाशी युद्धावेळी अमेरिकेने जेवढी मदत केलीय, ती परत घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी थेट धमकीच ट्रम्प यांनी दिली होती. युक्रेनला देत असलेल्या मदतीच्या बदल्यात जर युक्रेन दुर्मिळ खनिजे देत असेल तर ती मदत सुरु ठेवण्याचा विचार ट्रम्प करत आहेत. या खनिजांचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, ऊर्जा निर्मिती आणि संरक्षण क्षेत्रासाठी करता येणार आहे.
झेलेन्स्की यांच्या या निर्णयावर व्हाईट हाऊसकडूनही प्रतिक्रिया आली आहे. झेलेन्स्कीचा सध्याचा करार नाकारण्याचा निर्णय "अदूरदर्शी" असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.