लोकमत-
कितीही काळजी घ्या, कितीही दक्षता घ्या, दिवसातून पंधरा-वीस वेळा हात धुवा, चार भिंतीत कोंडून घालताना स्वत:ला क्वॉरण्टाइन करा, आरोग्याची काळजी घ्या, स्वच्छता राखा, पण कोरोनाचा विषाणू आपल्याला शोधून काढून आपल्यावर आक्रमण तर करणार नाही, या भीतीनं अख्ख्या जगाला व्यापलेलं आहे. अशावेळी कदाचित आपल्याला वाचवू शकले तर केवळ डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणाच, हेही प्रत्येकाला माहीत आहे, पण अशा मोक्याच्या वेळी एकही डॉक्टर आपल्यासोबत नसला, आपल्यावर उपचार करायलाच कोणी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली, तर त्या भावनेची भीती किती भयानक असेल याची कल्पनाच करता येणार नाही, पण ही स्थिती ओढवली आहे, झिम्बाम्ब्वे या देशातील नागरिकांवर. कारण त्या देशातील सार्वजनिक रुग्णांलयातील शेकडो डॉक्टरच बुधवारपासून संपावर गेले आहेत.तिथल्या डॉक्टरांचं म्हणणं आहे, आम्हीही माणूसच आहोत. आम्हालाही मरणाची भीती आहेच, पण जीवावर उदार होऊन रुग्णांचा जीव वाचविण्याचा आटापिटा करीत असताना आमच्या आरोग्याची, आमच्या सोयीसुविधांची काळजीच जर सरकारला नसेल, साध्या साध्या गोष्टीही आम्हाला मिळणार नसतील, तर आम्ही का म्हणून आमचा जीव धोक्यात घालावा?तिथल्या डॉक्टरांच्या संघटनेचे प्रमुख तवांदा झ्वाकाडा म्हणतात, रुग्णसेवेची, त्यांची जीवाची काळजी आम्हाला आहेच, पण पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंटही आम्हाला मिळणार नसतील, आमच्याच संरक्षणाची काळजी सरकार घेत नसेल, आम्ही स्वत:च मरणाच्या दारात उभे असू, तर तुम्हीच सांगा, आम्ही काम करायचं तरी कसं? जोपर्यंत सरकार सार्या सुविधा पुरवित नाहीत, तोपर्यंत आम्ही कामावर येणार नाही. सर्वसामान्य नागरिकांतही अत्यंत हतबलतेची भावना आहे. मुतुर्वा आणि तिच्यासारखे अनेक नागरिक म्हणतात, कोरोनाची लागण व्हायचा अवकाश, ‘आम्ही मरणार’, हे पक्कं ठरलेलं आहे. कोणीच आम्हाला वाचवू शकणार नाही.’झिम्बाम्ब्वेच्या सरकारी रुग्णालयांत औषधांचा तुटवडा आहे. ती खरेदी करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. अनेक अत्यावश्यक साधनं नाहीत. अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. त्यात विजेची टंचाई. अनेक ठिकाणी दिवसांत किमान आठ तास वीज नसते. याआधीही अनेक दिवस डॉक्टर संपावर गेले होते. कारण काही महिने त्यांचा पगारच झालेला नव्हता. जानेवारी महिन्यात ते कामावर आले. त्याचंही कारण झिम्बाम्ब्वेचे टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक स्ट्रीव मासीयीवा यांनी देशातील दोन हजार डॉक्टर जर परत कामावर आले, तर त्यांचा तीन महिन्यांचा पगार आपण स्वत: देऊ असं आश्वासन दिल्यावर! अर्थात त्यात फक्त डॉक्टरांचा समावेश होता, नर्सेसचा नाही! अशा परिस्थितीत कोण जगणार आणि कोण वाचणार?. दोष तरी कोणाला देणार?..