झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे नजरकैदेतहरारे : झिम्बाब्वेच्या लष्कराचे बुधवारी देशावर नियंत्रण असून देशाचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे (९३) यांनी ‘मला घरात कैदेत अटकेत ठेवण्यात आले आहे’, असे सांगितले. तथापि, लष्कराच्या जनरल्सनी बंड झाल्याचा इन्कार केला आहे. हरारेत संसदेबाहेरील रस्ते लष्कराच्या वाहनांनी अडवून ठेवल्यामुळे काही दशकांपासूनची सत्तेवरील मुगाबे यांची पकड ढिली होत असल्याचे दिसत आहे. वरिष्ठ सैनिकांनी मंगळवारी रात्री उशिरा दूरचित्रवाणी वाहिनीवरून देशाला उद्देशून भाषण केले. अध्यक्ष आणि त्यांचे कुटुंब सुरक्षित आहे, असे मेजर जनरल सिबुसिसो मोयो यांनी हळूहळू वाचून दाखवलेल्या निवेदनात म्हटले. मुगाबे यांच्या अवतीभवती असलेल्या गुन्हेगारांनाच आम्ही लक्ष्य करीत आहोत. आम्ही आमच्या मोहिमेत यशस्वी झालो की परिस्थिती सर्वसाधारण बनेल अशी अपेक्षा आहे, असे निवेदनात म्हटले. मोयो म्हणाले, लष्कराने सरकार ताब्यात घेण्याचा हा प्रकार नाही. ब्रिटनपासून १९८० मध्ये झिम्बाब्वे स्वतंत्र झाला तेव्हापासून मुगाबे यांचीच सत्ता असून जनरल्सच्या या कृतीमुळे त्यांच्या सत्तेला मुख्य आव्हान निर्माण झाले आहे. झिम्बॉब्वेच्या शेजारचा देश दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष जॅकोब झुमा म्हणाले की, मी दूरध्वनीवर मुगाबे यांच्याशी बोललो आहे. मुगाबे यांच्या जवळचे असलेल्यांपैकी झुमा हे एक आहेत. झुमा यांनी शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहनही केले आहे. मुगाबे यांच्या हुकुमशाहीला लष्कराने प्रदीर्घकाळ आधार दिला परंतु गेल्या काही आठवड्यांत दोघांमधील तणाव जाहीर झाला होता. लष्कर प्रमुख जनरल कॉन्स्टटिनो चिवेंगा यांचे वर्तन ‘देशद्रोही’ असल्याचे सत्ताधारी झेडएएनयु-पीएफ पक्षाने मंगळवारी म्हटले होते. मुगाबे यांनी देशाचे उपाध्यक्ष एम्मर्सन म्नॉनगावा यांना पदावरून दूर केल्यावर चिवेंगा यांनी मुगाबे यांच्यावर टीका केली होती. म्नॉनगावा यांना पदावरून दूर केल्यावर मुगाबे यांची पत्नी ग्रेस (५२) या अत्यंत महत्वाच्या पदावर पोहोचल्या होत्या. मुगाबे यांच्या वारस म्हणजेच देशाच्या अध्यक्षपदी त्या जाणार होत्या व याला लष्करातील वरिष्ठ अधिकाºयांचा तीव्र विरोध होता.
झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे नजरकैदेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 10:35 PM
झिम्बाब्वेच्या लष्कराचे बुधवारी देशावर नियंत्रण असून देशाचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे (९३) यांनी ‘मला घरात कैदेत अटकेत ठेवण्यात आले आहे’, असे सांगितले.
ठळक मुद्देमुगाबे यांच्या अवतीभवती असलेल्या गुन्हेगारांनाच आम्ही लक्ष्य करीत आहोत. आम्ही आमच्या मोहिमेत यशस्वी झालो की परिस्थिती सर्वसाधारण बनेल अशी अपेक्षा आहे, असे निवेदनात म्हटले