न्यूयॉर्क - अमेरिकेत माणसांच्या विचित्र हालचाली आणि वागणुकीचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात माणसे अगदी ‘झोम्बी’सारखे वागताना दिसत आहेत. त्यानंतर झोम्बी व्हायरस नावाचा प्रसार झाल्याच्या बातम्यादेखील प्रकाशित झाल्या होत्या. मात्र, एका ड्रगमुळे माणसे अशी वागत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
झायलाझिन याला झोम्बी ड्रग असेही म्हणतात. हे एक नवे ड्रग असून, त्याचा घातक परिणाम होत आहे. ज्यामुळे लोकांना उभेदेखील राहता येत नाही, असे व्हिडीओतून दिसून आले आहे; पण त्याहूनही चिंताजनक गोष्ट म्हणजे या ड्रगचे प्रत्यक्षात खरंच ‘झोम्बी’सारखे परिणाम आहेत. ड्रग घेणाऱ्यांच्या त्वचेवर जखमांसारखे व्रण दिसण्यास सुरुवात होते. ते अतिशय वेगाने पसरतात. पुढे यात मृत्यूही होतो. उपचार न केल्यास त्वचेवर खड्डे पडण्यास सुरुवात होते.
याचे विपरित परिणाम मनुष्याच्या शरीरावर होत आहेत. ते जास्त प्रमाणात सेवन केले तर त्याहून बाहेर पडणे कठीण आहे. यात उपचारालाही अतिशय कमी प्रतिसाद मिळतो. जोपर्यंत या ड्रगवर बंदी घातली जात नाही तोपर्यंत असे झोम्बीसदृश्य लोक दिसत राहतील.