सॅन फ्रॅन्सिस्को : फेसबुकचा जनक आणि सोशल मीडियामध्ये जगभरात क्रांती घडवून आणणाऱ्या मार्क झुकेरबर्गने बुधवारी लेकीच्या जन्माच्या निमित्ताने दातृत्वाचे आधुनिक प्रोफाइल जगापुढे उलगडले. कन्यारत्नाचा लाभ झाल्यानिमित्ताने फेसबुकच्या ९९ टक्के समभागांचे म्हणजे जवळजवळ सर्व समभागांचे दान करण्याचे मार्क आणि त्याची पत्नी प्रिसिला चॅन यांनी निश्चित केले आहे. ही रक्कम ४५ अब्ज डॉलर्स इतकी असून, ती चॅन झुकेरबर्ग फाउंडेशन या नव्याने स्थापन केलेल्या धर्मादाय संस्थेला देण्यात येणार आहे.मार्कने आपल्या मुलीचे नाव मॅक्स (मॅक्सीमाचे लघुरूप) असे ठेवले आहे. आपल्या मुलीला उद्देशून त्याने फेसबुकवर एक पत्र लिहून, या समभाग दानाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.लेकीला पत्र...मॅक्स तू जशी चॅन-झुकेरबर्ग कुटुंबाची नवी सदस्य झाली आहेस, त्याचवेळेस आम्ही चॅन झुकेरबर्ग इनिशिएटिव्ह हा उपक्रम सुरू करत आहोत. यामुळे जगभरातील लोकांना एकमेकांशी जोडणे शक्य होणार असून, नव्या पिढीतील मुलांमध्ये समानतेचा अंगीकार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यामध्ये आमचा प्रमुख भर रोग निवारण, सशक्त समाज निर्मितीवर असणार आहे.- मार्क झुकेरबर्ग सध्या जगातील सातव्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती आहे. फोर्ब्जच्या रिअल टाइम बिलिनेयर्स रँकिंगच्या आकडेवारीनुसार, त्याची संपत्ती ४६.८ अब्ज डॉलर्स इतकी आहे. - १९७५ साली मायक्रोसॉफ्ट कंपनी स्थापन करणाऱ्या बिल गेट््स यांनीही केवळ चार टक्के समभाग आपल्याकडे ठेवून बाकी सर्व समभाग दान केले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून, मार्क झुकेरबर्गने केलेल्या या दानाचे जगभरात कौतुक होत आहे.- बिल अँड मेलिंडा गेट््सप्रमाणे चॅन झुकेरबर्ग फाउंडेशन समाजकार्य उत्तम प्रकारे करेल, अशी खात्री कोट्यवधी नेटिझन्स व्यक्त करत आहेत.दानयज्ञ सुरूच... मार्क आणि चॅन २०१२ साली विवाहबद्ध झाले. यापूर्वीही त्यांनी शिक्षण, तसेच सॅन फ्रॅन्सिस्को हॉस्पिटल आणि इबोलाचा सामना करण्यासाठी निधी म्हणून लक्षावधी डॉलर्सची मदत केलेली आहे. मार्क ३१ वर्षांचा असून, त्याने हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतलेले आहे. त्याने २००४ साली फेसबुकची स्थापना केली.
झुकेरबर्गच्या दातृत्वाचा ‘मॅक्स’मार्क!
By admin | Published: December 03, 2015 4:10 AM