Pakistan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्या मृत्यूच्या 45 वर्षांनंतर पाकिस्तानसर्वोच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा चुकीची ठरवली आहे. लष्करी राजवटीत झुल्फिकार अली भुट्टो यांना 1979 मध्ये फाशी देण्यात आली होती. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. आता त्यांच्यावरचा खटला योग्यरित्या चालवला गेला नसल्याचे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून या प्रकरणी सुनावणी सुरू होती आणि सोमवारी न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.
झुल्फिकार अली भुट्टो यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर पुनर्विचार याचिका माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी 2011 मध्ये दाखल केली होती. आसिफ अली झरदारी, हे भुट्टो यांचे जावई आणि आता त्यांनी स्थापन केलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख आहेत. झरदारी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 13 वर्षांच्या सुनावणीनंतर निर्णय आला आहे. सरन्यायाधीश काझी फैज इसा म्हणाले, 'आमचा विश्वास आहे की, झुल्फिकार अली भुट्टो यांच्याविरुद्धचा खटला अयोग्य पद्धतीने चालवण्यात आलाहोता.' सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचे यावर एकमत झाले.
या याचिकेवर नऊ सदस्यांच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली. कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान एका वकिलाने तर भुठ्टो यांच्यावर खुनाचा कोणताही गुन्हा नसून, हा खटल्याचा खून असल्याचे म्हटले. या खटल्यातील ऐतिहासिक निकालानंतर आसिफ अली झरदारी म्हणाले की, आमच्या कुटुंबातील तीन पिढ्या न्यायालयाचे हे शब्द ऐकण्यासाठी आतुर होत्या. न्यायालय आता या प्रकरणी सविस्तर आदेश जारी करणार आहे.