संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना या पाच योजनांच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामुळे संचारबंदीच्या काळात नागरिकांची उपासमार होणार नाही. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या घोषणेचे सर्व लाभार्थ्यांनी स्वागत केले आहे.
कोरोनामुळे सतत लॉकडाऊन होत आहे. त्यामुळे आम्हाला कामही मिळत नाही. आर्थिक परिस्थिती विस्कटलेली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने एक हजार रुपये देण्याची घोषणा केली खरी; परंतु प्रत्यक्षात ही रक्कम कधी मिळणार आहे हे शासनाने स्पष्ट करावे.
- भिका राऊत
गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या काळात हाताला कामही मिळत नाही. आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे शासनाने संचारबंदी लागू केली आहे. या काळात गोरगरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी प्रत्येकी १ हजार रुपये शासनाकडून दिले जाणार आहेत. हा निर्णय योग्य असून, ती रक्कम लवकर द्यावी.
- अभिषेक माने
वर्षभरापासून आम्ही शेतकरी हैराण आहोत. कोरोनाने आमच्यावर मोठे संकट ओढवले आहे. दुसरीकडे अवकाळी पाऊसही पिकांचे नुकसान करीत आहे. अशा परिस्थितीत शासनाने दिलेली एक हजार रुपयांची मदत आमच्यासाठी फायदेशीर ठरेल. परंतु, ती आम्हाला कधी मिळणार हे सांगावे.
- शशिकला कावळे
राज्य सरकारने संकटाच्या काळात आम्हाला जी मदत केलेली आहे ती फार कमी आहे. सध्या महागाई वाढल्याने हजार रुपयांत काय होईल हे तुम्हीच सांगा. शासनाने दिलेल्या रकमेत वाढ करावी.
- श्याम बोंद्रे
शेतकऱ्यांवर संकटांची मालिकाच सुरू आहे. कधी अवकाळी पाऊस पिकांचे नुकसान करतो तर कधी कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनने भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शासनाने कोरोना काळात दिलेली मदत ही अत्यल्प आहे. त्यात काहीच होणार नाही.
- अनसूयाबाई कोरडे