लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने देशी दारूच्या २६ बॉक्ससह एक वाहन ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी पहाटेच्या सुमारास सिंदखेड राजा- जालना रोडवरील नाव्हा शिवारातील चेक पोस्टवर करण्यात आली.विधानसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेमुळे जिल्ह्यात ड्राय-डे जाहीर करण्यात आला होता. मात्र, एका वाहनातून देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून या पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास जालना- सिंदखेड राजा मार्गावरील चेकपोस्टवर सापळा रचला.सिंदखेड राजाकडून आलेल्या एका जीपची पाहणी केली असता आतमध्ये देशी दारूचे २६ बॉक्स आढळून आले. त्यात १८० मिलीच्या १२४८ बाटल्या आढळून आल्या. पथकाने जीपसह ४ लाख ६४ हजार ८९६ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. म्हसाजी नाथा वाघ (रा. महारखेड ता. सिंदखेड) यास ताब्यात घेण्यात आले.दरम्यान, अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाच्या दिवशी सहा गुन्हे दाखल करून ५ लाख १४५२ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर आचारसंहितेच्या कालावधीत २१ सप्टेंबर ते २१ आॅक्टोबर या कालावधीत १३० गुन्हे उघडकीस आणून ९७ जणांना अटक करण्यात आली. तर १४ लाख ६१ हजार ३८८ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
देशी दारूचे २६ खोके केले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 1:21 AM