परतूर (जि.जालना): अभ्यासाचा कंटळा आल्याने घरातून दहा महिन्यापूर्वी निघून गेलेला आकाश तांगडे यास शोधून पोलिसांनी शुक्रवाी आई-वडीलांच्या स्वाधीन केले. तो अहमदनगर येथे एका शेतक-याच्या शेतात काम करत होता.
परतूर तालूक्यातील रोहीणा खू. येथील आकाश शिवाजी तांगडे हा शहरातील एका शाळेत दहावीत शिकत होता. शिक्षणाचा कंटाळा आल्याने तो अचानक रेल्वेने औरंगाबाद व तेथून पुढे अहमदनगर येथे गेला. येथे उत्तम मुरलीधर हराळ या शेतक-याची व आकाश याची ओळख झाली. यावेळी हराळ यांनी त्यास केवळ जेवणावर कामाला ठेवले.
या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात वडिल शिवाजी तांगडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असल्याने पोलिस आकाशचा शोध घेत होते. गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव व पोलीस काँस्टेबल शाम गायके यांनी नगर येथे गेले. स्थानिक पोलिसांची मदत घेत पोलीस थेट हराळ यांच्या शेतात पोहचले. तेथून आकाशला ताब्यात घेवून गुरुवारी रात्री परतूर येथे आणले.
शुक्रवारी सकाळी त्यास पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी शिक्षणाचा कंटाळा आल्याने आपण घरातून निघून गेलो होतो, असे आकाशने सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, पोलिस निरीक्षक आर. टी. रेंगे उपनिरीक्षक विजय जाधव, शाम गायके यांनी आकाशच्या शोध मोहिमेत सहभाग घेतला.